विशाळगड हिंसाचारप्रकरणी योग्य ती कारवाई करू - अजित पवार; तोडफोडीची पाहणी करून पीडितांची घेतली भेट

विशाळगड किल्ल्यावरील अतिक्रमणविरोधात १४ जुलैला करण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागून पायथ्याशी असलेल्या आणि अतिक्रमणाशी दुरान्वयानेसुद्धा संबंध नसलेल्या गजापुरात जमावाने मोठ्या प्रमाणात तोडफोड केली.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

कोल्हापूर : विशाळगड किल्ल्यावरील अतिक्रमणविरोधात १४ जुलैला करण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागून पायथ्याशी असलेल्या आणि अतिक्रमणाशी दुरान्वयानेसुद्धा संबंध नसलेल्या गजापुरात जमावाने मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या तोडफोडीची गुरुवारी पाहणी केली व पीडितांची विचारपूस केली. या तोडफोडीप्रकरणी योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

यावेळी पीडितांनी नुकसानीची माहिती दिली व झालेल्या हल्ल्याचा भयावह अनुभव अजित पवारांना कथन केला. यावेळी अजित पवार म्हणाले की, मी आत्ताच कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेतली आहे. विशाळगडावरील ज्या व्यावसायिक आस्थापना आहेत, जे अतिक्रमण झाले आहे, त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. कोणत्याही घराला हात लावला जाणार नाही.

जमावाला भडकवण्याचा बंडा साळोखेवर आरोप

छत्रपती संभाजी राजे यांनी १४ जुलैला विशाळगड अतिक्रमणमुक्तीसाठी हाक दिली होती. मात्र, संभाजीराजे हे समर्थकांसह गडावर पोहोचण्यापूर्वीच रवींद्र पडवळांच्या चिथावणीनंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड प्रमाणात गजापुरात हिंसाचार केला. रवींद्र पडवळसह कोल्हापुरातील बंडा साळोखे याच्यावर जमावाला भडकवण्याचा आरोप आहे. दंगलीनंतर फरार झालेल्या या दोघांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

शिवप्रेमी असे कृत्य करूच शकत नाहीत - वडेट्टीवार

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुरोगामी विचाराचे खासदार निवडून आल्यामुळे जातीयवादी विचाराच्या पक्षांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यातूनच खऱ्या अर्थाने काहीतरी कट शिजायला सुरुवात झाली. आता केवळ शिवप्रेमींच्या नावाखाली विशाळगडावरील घटना दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वास्तविक शिवप्रेमी असे कृत्य करूच शकत नाही. जी घटना घडली, ती अतिरेक्यांचा प्रकार आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

सरकारच्या आदेशाशिवाय अशी उद्दाम कारवाई शक्य नाही - आव्हाड

ज्या भूमीला छत्रपतींचा स्पर्श झाला आहे, तेथे धर्मांधता चालणार नाही. विशाळगडावर सुरू असलेली घरे आणि दुकाने निष्कासित करण्याची कारवाई पूर्णतः बेकायदेशीर आहे. राज्यातील वातावरण खराब व्हावे, या उद्देशानेच सर्व प्रशासकीय यंत्रणा हे काम करीत आहे. सरकारच्या आदेशाशिवाय प्रशासकीय अधिकारी एवढी उद्धट आणि उद्दाम कारवाई करूच शकत नाहीत, असा आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका पोस्टद्वारे केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in