जेवणावरून झाला वाद अन् मित्रावरचं केला कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; आरोपीला अटक 

सलीम आणि भरत यांच्यात जेवणावरून वाद होऊन या वादाचे रूपांतर राड्यात झालं. रागाच्या भरात सलीमने कुऱ्हाड उचलली अन्...
जेवणावरून झाला वाद अन् मित्रावरचं केला कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; आरोपीला अटक 

विशेष प्रतिनिधी

भिवंडी : मित्रांमध्ये क्षुल्लक कारणावरून खटके उडून वादाचे रूपांतर तुफान राड्यात झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यातच भिवंडीत मंडप डेकोरेशनचे काम करणाऱ्या तीन मित्रांपैकी दोन मित्रांमध्ये जेवणाच्या कारणावरून भांडण होऊन या रागातून एका मित्राने दुसऱ्या मित्रावर कुऱ्हाडीने वार केल्याची धक्कादायक घटना कोनगाव येथील एका गोदामातून समोर आली आहे. या हल्ल्यात एकजण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी कोनगाव पोलिस ठाण्यात मित्रावर गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. सलीम अन्वर खान (३७) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. तर भरत शामबाबू राजलोहार (२२) असे हल्ल्यात जखमी झालेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी गोविंदकुमार मुन्ना वर्मा यांचा मंडप डेकोरेशनचा व्यवसाय आहे.त्यात आरोपी सलीम व जखमी भरत हे दोघे त्यांच्यासोबत काम करत आहेत.दरम्यान १९ मे रोजी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास हे तिघेही कोनगाव परिसरातील म्हात्रेगाव मैदानातील इंग्रजी माध्यमिक विद्यालया जवळील अनिल कुमार यांच्या गोदामात मंडप डेकोरेशनचे काम करण्यासाठी गेले होते. त्यावेळी सलीम आणि भरत यांच्यात जेवणावरून वाद होऊन या वादाचे रूपांतर राड्यात झाल्याने सलीमने याच रागातून भरतवर कुऱ्हाडीने वार करून त्यास गंभीर जखमी केले आहे.जखमीवर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी गोविंदकुमार वर्मा याच्या फिर्यादीवरून सलीमवर ३०७ सह कोनगाव पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता २३ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in