संमेलनाला वादाची फोडणी; ‘मातोश्री’वर मर्सिडिज पोहोचल्या की पदं मिळतात - गोऱ्हेंचा आरोप, ठाकरे गट आक्रमक; केले ‘जोडे मारो’ आंदोलन

नवी दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विविध वादांनी गाजत आहे. संमेलनाआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीत
 नीलम गोऱ्हे
नीलम गोऱ्हेसंग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई/नवी दिल्ली : नवी दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विविध वादांनी गाजत आहे. संमेलनाआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीत महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात आल्यानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले होते. आता खुद्द संमेलनाच्या शेवटच्या दिवशी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी आणखी एका वादाला फोडणी दिली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडिज दिल्या की एक पद मिळायचे, असे खळबळजनक विधान नीलम गोऱ्हे यांनी केले. त्यांच्या या विधानानंतर शिवसेना ठाकरे गट गोऱ्हेंविरोधात आक्रमक झाला असून ठिकठिकाणी त्यांच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले.

९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमात मुलाखतीदरम्यान नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “कार्यकर्त्यांना कमी समजण्याचे कारण नाही. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी ठाण्यातून माणसे आणली जायची. गल्ला गोळा करण्याचे काम एकनाथ शिंदेंना दिले होते. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की पदे मिळायची. तसेच ठाकरेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांनाच आम्ही नको झालो होतो. बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांचे सगळीकडे लक्ष होते, मात्र त्यानंतर त्यात खूप बदल होत गेले. २०१९ साली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तेव्हा आम्हालाही खूप धन्य वाटले. बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री झाला, हे कारण होते. मात्र आमदारांना भेटी मिळणार नाहीत. कुठल्याही विषयावर भेट नाही. या सर्व गोष्टींचा विचार केला तर स्थित्यंतरे होण्यामागे बरीच कारणे आहेत. त्यावर वेगळी चर्चा करायला माझी तयारी आहे.”

नीलम गोऱ्हेंच्या या आरोपानंतर राजकीय वर्तुळातून तिखट प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यांच्या पुण्यातील निवासस्थानाबाहेर ठाकरे गट आक्रमक झाला असून, गोऱ्हे यांच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘नीलम गोऱ्हे हाय हाय’, टायरवाल्या काकू’, अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

आठ मर्सिडिजच्या पावत्या दाखवा - संजय राऊत

माझा नीलम गोऱ्हे यांना एकच प्रश्न आहे, त्यांना चार वेळा उद्धवसाहेबांनी आमदार केले. त्यांनी किती वेळा मर्सिडीज दिल्या? आमच्या महिला आघाडीचा विरोध असताना, त्यांना उद्धवसाहेबांनी चार वेळा विधान परिषदेचे आमदार केले. उपसभापती केले. त्यांनी आठ मर्सिडीज दिल्यात का? असेल तर पावत्या घेऊन याव्यात, असे आवाहन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले.

ही नीलम गोऱ्हेंची नमकहरामी - अंबादास दानवे

ही नीलम गोऱ्हेंची नमकहरामी आहे. मी ग्रामीण भागातील सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. आज मी राज्याचा विरोधी पक्षनेता आहे. मला उलट पक्षाने वेगवेगळ्या कामासाठी निधी दिला. माझ्याकडे पक्षाने कधीही पैसे मागितले नाहीत, असे ठाकरे गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले.

नाव गोऱ्हे, काम मात्र काळे - किशोरी पेडणेकर

स्वत:ला हुशार समजणारी बाई वेळ न बघता काही बरळते. तीन वेळा आमदार, दोन वेळा उपसभापती झालेल्या या बाईने किती मर्सिडिझ दिल्या आणि कोणाला दिल्या हे सांगावे. नाव गोऱ्हे असले तरी यांचे काम मात्र काळे आहे. मुळात गोऱ्हे एक नंबरची खोटारडी बाई आहे. शिव्या घालायच्या देखील लायकीची नाही. आधी सतत मातोश्रीवर बसलेली असायची, अशी टीका माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली.

नीलम गोऱ्हेंनी पैसा कुठे ठेवला? - सुषमा अंधारे

नीलम गोऱ्हे ३० वर्षे ज्या पक्षात राहिल्या, तिथे असे काही होत असेल तर त्यांनी एवढा पैसा कुठे ठेवला, या प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे. त्या ‘मातोश्री’वर पडीक असायच्या. कुठे कुठे प्रॉपर्टी घेतली, परदेशात किती पैसे गुंतवले, याचा जाब द्यायचा म्हणता, पण जाब हा बरोबरीच्या माणसाला द्यायचा असतो. चापलुशा, बदमाशी करून आणि मर्जी मिळवून पदे मिळवणाऱ्यांची उंची वाढवायची नसते. नीलम गोऱ्हे चार वेळा आमदार असली काय किंवा विधानसभेवर असली काय, आमच्या नजरेत बदमाश आणि गद्दार असणार आहे, असा पलटवार ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला.

ओघाने बोलले - गोऱ्हेंची सारवासारव

मी जे काही बोलले, ते स्वतःच्या अनुभवाच्या आधारावर बोलले आहे. यासंदर्भात अजून काही वेगळे भाष्य करायचे नाही. मला मुद्दाम काही वाद वाढवायचाही नाही. कारण मी जे काही सांगितले ते मी ओघात सांगितले आहे. मी लॉबिंग करून किंवा न करता काहीही मिळवलेले नाही. शिवसेनाप्रमुखांनी जो माझ्यावर विश्वास टाकला, त्यावेळी मी ती जबाबदारी पार पाडली, अशी सारवासारव नंतर नीलम गोऱ्हे यांनी केली.

राजकारणात त्यांनी त्यांचं चांगभलं केलंय - उद्धव ठाकरे

एक महिला म्हणून त्यांचा आदर आहे. त्यांनी जे विधान केलं ते जाऊ द्या, मी त्याकडे लक्ष देत नाही. दाखवाना मर्सिडीज. ही गईगुजरी लोकं आहेत. राजकारणात त्यांनी त्यांचं चांगभलं केलंय. गद्दार सेनेत गेलेल्या लोकांवर मी बोलत नाही. गद्दार सेनेत गेलेल्यांच्या लेखी शिवसेना संपवली, असे त्यांना वाटत असेल. पण माझी जुनी माणसं, निष्ठावान माणसं माझ्यासोबत आहेत, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे साहित्य संमेलनात पडसाद

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे आणि त्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे पडसाद अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उमटले. मराठवाडा साहित्य परिषदेने यासंदर्भात मांडलेल्या ठरावावरून साहित्य महामंडळाच्या बैठकीत खडाजंगी झाली.

संमेलनाच्या समारोपाच्या पूर्वसंध्येला झालेल्या महामंडळाच्या बैठकीत संमेलनात मांडण्याच्या ठरावांवर चर्चा केली जाते. या बैठकीत मराठवाडा साहित्य परिषदेने सध्या गाजत असलेल्या मराठवाड्याच्या प्रश्नांसंबंधीचा ठराव मांडला. “सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू, संतोष देशमुख यांची हत्या तसेच मंत्र्यांचे भ्रष्टाचार आणि मणिपूरमध्ये होणाऱ्या हिंसक घटना, यावर सरकार फक्त बोलघेवडेपणा आणि पक्षपातीपणा करत आहे. हे चित्र बदलण्यासाठी पंतप्रधान आणि त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांनी स्वपक्षीय राजकारणाचा विचार न करता, ही गुंडगिरी संपवण्याची हमी देण्याची मागणी हे संमेलन करत आहे,” असे या ठरावात म्हटले होते. मात्र, हा ठराव स्वीकारण्यास महामंडळ फारसे उत्सुक नव्हते. ‘आपण केवळ साहित्यिक विषयांवर बोलूया. सामाजिक-राजकीय विषयांवर नको,’ अशी भूमिका महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. त्यावर ‘संमेलनात राजकीय-सामाजिक विषयांवरील परिसंवाद घेतले जातात. मग ठराव का नकोत?’ अशी भूमिका मराठवाडा साहित्य परिषदेने मांडली.

logo
marathi.freepressjournal.in