आज आळंदी येथून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. या सोहळ्यासाठी अलंकापूरी सजली असून वारकऱ्यांच्या हरिनामाच्या नामघोषानं दुमदुमली आहे. मात्र या सोहळ्याला गालबोट लागल्याचं समोर आलं आहे. पोलीस आणि वारकरी यांच्यात मंदिर प्रवेशावरुन वाद झाल्यानं पोलिसांकडून वारकऱ्यांवर सौम्य लाठीचार्ज करण्यात आला आहे.
आज माऊलींची पालखी विठूरायाला भेटण्यासाठी मार्गस्थ होणार आहे. यासाठी हजारो वारकरी हे अलंकापूरीत इंद्रायणीकाठी जमले आहेत. पालखी प्रस्ताना दरम्यान मानाच्या पालख्यांना फक्त प्रवेश दिला जातो. ज्या दिंड्या मानाच्या असतात, त्या मंदिराच्या जवळ असतात. मात्र, ऐनवेळी या दिंडीतील मोजक्या लोकांना मंदिराच्या आत प्रवेश देण्यात आल्यानं इतर वारकरी नाराज झाले. नाराज झालेले वारकरी मंदिरात जाण्यासाठी गर्दी करत होते. यावेळी पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये वाद झाला.
आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच आळंदी येथून प्रस्तान होणार आहे. यासाठी हजारोच्या संख्येनं वारकरी आळंदीला इंद्रायणीच्या काठी जमले आहेत. वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस फाटा तैनात करण्यात आला आहे. मात्र, वारकरी आणि पोलीस यांच्यात मंदिर प्रवेशावरुन वाद झाल्यानं वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या पोलिसांकडूनच वारकऱ्यांवर सौम्य लाठीचार्ज करण्यात आला आहे. वारकऱ्यांवर केलेल्या लाठीचार्जमुळे वारकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी उमटली आहे.
हा वाद मिटल्यानंतर माऊलींच्या मंदिरासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसंच कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि वारीला गालबोट लागू नये यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये झालेल्या वादानंतर काही काळ तणाव निर्माण झाला होता. यानंतर वारकरी आणि पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.