
शिवसेनेचे उपनेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांची शिंदे गटाशी गुफ्तगू सुरू असून खासदारांच्या बैठकीच्या दिवशी ते दिल्ली येथे गेले होते. तेथे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. दोन वेळा त्यांनी शिंदे यांची भेट घेतल्याने ते शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे; मात्र “आपण वैयक्तिक कारणांनी दिल्लीत आलो आहोत,” असे खोतकरांनी स्पष्ट केले आहे.
अर्जुन खोतकर हे काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे गेले होते. खासदारांची बैठक ज्या दिवशी झाली, त्याच दिवशी शिंदे यांची खोतकर यांनी महाराष्ट्र सदन येथे भेट घेतली होती, अशी मतदारसंघात चर्चा होती. त्यानंतर आता ते शिंदे गटात सामील होत असल्याचे समजते; मात्र त्यांनी आपण अजूनही शिवसेनेतच आहोत, असे स्पष्ट केले. अर्जुन खोतकर हे शिवसेनेचे निष्ठावंत मानले जातात.