मुंबई : ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना एका लष्करातील जवानाने अडीच कोटींची मागणी केल्याच्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी त्या जवानाला अटक केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त मनोज लोहिया म्हणाले, ईव्हीएममध्ये फेरफार करण्यासाठी शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्याकडे अडीच कोटी रुपयांची मागणी केल्याप्रकरणी लष्कराच्या जवानाला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आले. या जवानावर कर्ज आहे. या कर्जातून सुटका मिळवण्यासाठी त्याने दानवेंकडे ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करण्यासाठी अडीच कोटी रुपयांची मागणी केली होती. यासाठी त्याने पुण्यात दानवेंची भेट घेतली होती आणि तो पैशासाठी त्याच्या मागे लागला होता. यानंतर अंबादास दानवेंचे बंधू राजेंद्र दानवेंनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. राजेंद्र दानवेंनी आरोपीला (जवान) दीड कोटी रुपये घेण्यासाठी बस स्टॅन्ड जवळ बोलवलं होतं. त्यावेळी साध्या वेशातील पोलीस तेथे होते. तेव्हा राजेंद्र दानवे आणि आरोपीमध्ये चर्चा झाल्यानंतर त्यांच्याकडून १ लाख रूपये टोकन घेताना पोलिसांनी आरोपीला (जवान) रंगेहाथ पकडले. आरोपीने कर्जातून सुटका होण्यासाठी त्याने ईव्हीएम मशीनमध्ये फेराफार करण्याचे खोटे सांगितले. उलट आरोपीला ईव्हीएम मशीनबद्दल काही माहिती नाही, असे लोहिया यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
'या' कलमा अंतर्गत गुन्हा दाखल
आरोपीचे नाव मारूती ढेकणे (४२वय) आहे. तो सध्या जम्मू-काश्मीरमधील उधमपूर येथे तैनात आहे. आरोपीवर भारतीय दंड संहिता कलम ४२० (फसवणूक) आणि ५११ (गुन्हा करण्याचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील रहिवासी आहे.