
नुकताच देशभरात रक्षाबंधन हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. भाऊ बहिणीमधील हळुवार प्रेमळ नात्याचा हा सण जितका आनंददायी तितकाच भावनिक आहे. याची प्रचिती नुकतीच पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही तालुक्यातील विविध भागातून अनेक भगिनींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांच्या नारायणगाव येथील निवासस्थानी उपस्थिती लावत रक्षाबंधन सोहळा साजरा केला आहे. विशेष म्हणजे एक दोन नाहीतर तब्ब्ल ७ हजार ५०० महिलांनी याठिकाणी येत बंधुराया असलेल्या आमदार बेनके यांना राख्या बांधल्या आहेत. रक्षाबंधन हा केवळ एक सण नाही. तर एका बहिणीने आपल्या भावाकडून तिचे रक्षण करण्याचे घेतलेले वचन आहे. बहीण भावाच्या या नात्याची अनेक उदाहरणे आहेत. अनेक सामाजिक संस्थांकडून कर्तव्यावर असणाऱ्या सैनिकांना, पोलिसांना देखील प्रतिवर्षी राख्या बांधण्यात येतात. मात्र पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात गुरुवार ११ ऑगस्ट रोजी आगळावेगळा रक्षाबंधन सोहळा पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जून्नरचे आमदार अतुल बेनके दरवासरही रक्षाबंधनाचा कार्यक्रम आपल्या निवासस्थानी आयोजित करतात. कोरोनामुळे तालुक्यातील अनेक बहिणींना बेनके याना भेटता आले नाही. मात्र कोरोनाची लाट ओसरल्यानंतर निर्बंधमुक्त अशा वातावरणात यंदाच्या रक्षाबंधन सोहळ्याला तालुक्यातील असंख्य महिला भगिनींनी बेनके यांच्या निवासस्थानी हजेरी लावली. यावेळी जवळपास ७ हजार ५०० महिलांनी त्यांना राखी बांधत मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला.
आमदार भाऊरायाने घेतला स्वतः भगिनींसोबत सेल्फी!
या सोहळ्याप्रसंगी आमदार बेनके यांचे दोन्ही हात राखींनी भरून गेले होते. बेनके यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून आमदार अतुल बेनके यांचा हा लुक बघण्यासारखा आहे. याप्रसंगी बेनके यांनी स्वतः आपल्या या भगिनींच्या गराड्यात उभे राहत सेल्फी काढला आहे. त्यामुळे भगिनींचा आनंद आणखी द्विगुणित झाला आहे.