
- प्रासंगिक
- महेंद्र दामले
देशातील महनीय राष्ट्रीय नेत्यांची शिल्प घडवणारे हात, ही राम सुतार यांची जनमानसातील ओळख. त्यांनी घडवलेली महात्मा गांधीजींची शिल्प जगाच्या वेगवेगळ्या भागात सुतारांच्या बोटातील जादूची साक्ष देत उभी आहेत. या जादूने नदीचा प्रवाहही शिल्पात बंदिस्त केला आणि तत्कालीन पंतप्रधान नेहरूंना अचंबित केले. राम सुतारांच्या बोटांमधील ही कला आता ‘महाराष्ट्रभूषण’ ठरली आहे.
शिल्पकार राम सुतार यांना १९ फेब्रुवारी २०२५ रोजी वयाची १०० वर्षं पूर्ण झाली. नुकताच महाराष्ट्र शासनातर्फे ‘महाराष्ट्रभूषण’ हा सन्मान त्यांना जाहीर झाला आहे. राम सुतार या वयातही केवळ कार्यक्षमच नाहीत, तर कार्यमग्न आहेत. त्यांची ही कार्यमग्नता आणि त्यांची शिल्प यामुळे ते सतत चर्चेत असतात. महाराष्ट्राच्या मातीतून अनेक महान शिल्पकार तयार झाले. त्याच महान परंपरेतले शिल्पकार म्हणून राम सुतार यांच्याकडे पहिलं जातं. ज्येष्ठ कला समीक्षक दीपक घारे म्हणतात की, आधुनिक वास्तववादी भारतीय शिल्पकलेची शतकभराची वाटचाल आणि राम सुतार यांच्या शिल्पकलेचा प्रवास हे दोन्ही समांतर झालेले दिसते. स्वातंत्रोत्तर काळातील शिल्पकारांच्या पिढीने गणपतराव म्हात्रे, विनायक करमरकर आणि बालाजी तालीम यांच्या शिल्पांवरून प्रेरणा घेत, त्यांचा आदर्श ठेवून निर्मिती केली.
गुजरातमध्ये केवडियाजवळ ‘स्टॅचू ऑफ युनिटी’ म्हणून ओळखला जाणारा, नर्मदा सरोवर प्रकल्पाच्या ठिकाणी उभारलेला सरदार पटेल यांचा ५२२ फूट उंच, जगातील सर्वात उंच पुतळा राम सुतार त्यांनी केलेल्या शिल्पाआधारेच उभारला गेला. त्यामुळे महाराष्ट्राच्या आणि भारताच्या सर्वसामान्य जनतेमध्ये सुद्धा ते लोकप्रिय झाले. स्वातंत्र्योत्तर काळात इतक्या मोठ्या शिल्पाची निर्मिती करू शकणारे ते पहिलेच भारतीय शिल्पकार होत. त्या आधी मायावती या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री असताना त्यांनी सुद्धा राम सुतार यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शिल्प घडवून घेतली होती त्याची खूप चर्चाही झाली होती.
कलारसिकांना सुतार माहीत आहेत ते त्यांच्या महात्मा गांधी यांच्या शिल्पामुळे. संसद भवनाच्या आवारातील विचारमग्न गांधीजी, त्यांच्या चेहऱ्यावरील भाव, ते भाव घडवणारी शिल्पकारांची बोटं, त्यांच्या आधारे त्यांनी मातीला दिलेला आकार, निर्माण केलेला पोत आणि तयार झालेला अतिशय संवेदनशील चेहरा... यामुळे राम सुतार रसिकांच्या मनावर कायमची छाप पाडतात. गांधीजी आपल्याशी बोलत आहेत आणि एक मुद्दा मांडून त्यांनी आपल्याला अंतर्मुख केलं आहे आणि ते सुद्धा मनन करू लागले आहेत, असा अनुभव हे पाहताना येतो. सुतार म्हणतात, गांधी असं म्हणताक्षणी आपल्यासमोर अहिंसा, सद्भावना, सत्य यांची आठवण येते.
गेल्या ६० वर्षांत सुतार यांनी जगभरात ३७० पेक्षा जास्त गांधीजींच्या शिल्पांची निर्मिती केली आहे.
राम सुतार यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील गोंडुर या गावात झाला. त्यांचे वडील लोहार काम आणि सुतार काम करीत असत. शेतीची अवजारे, बैलगाड्या यासोबत त्यांना लाकडावरचे कोरीवकाम सुद्धा येत असे. लहानपणी अशा वातावरणात राहिल्याने राम सुतार शेणाच्या सारवलेल्या भिंतीवर चित्र काढ, मातीची खेळणी बनव अशा अनेक गोष्टी करत असत. त्यांच्या अंगी असलेला हा गुण त्यांचे शिक्षक श्रीराम जोशी यांनी ओळखला आणि त्यांनी राम यांना मुंबईतील सर ज जी कलामहाविद्यालयात कलेचे शिक्षण घेण्यास सुचविले. १९५३ साली त्यांनी शिल्पकलेचे शिक्षण पूर्ण केले. मेयो मेडल मिळवले. काही काळ पुरातत्व खात्यामध्ये आणि माहिती आणि जनसंपर्क विभागात नोकरी केली. पण लवकरच स्वतःच्या स्वतंत्र व्यवसायाला सुरुवात केली.
१९६० च्या सुमारास त्यांनी चंबळ नदीच्या शिल्पाचे काम केले. त्यातून त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कारकीर्दीची सुरुवात झाली, असे म्हणता येईल. सिमेंट-काँक्रीटमधील हे शिल्प चंबळ नदीचे प्रतीकात्मक शिल्प आहे. त्यात मध्यभागी हातात कलश घेतलेली देवता (चंबळ नदी) आहे आणि तिच्या दोन बाजूंनी दोन राज्ये- राजस्थान आणि मध्य प्रदेश ही बालक रूपात प्रतीकात्मक रूपात दर्शवली आहेत. हे शिल्प गांधीसागर या धरणाच्या ठिकाणी असून त्याची उंची ४५ फूट आहे. या शिल्पाची तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी खूप स्तुती केली आणि भाकरा येथील प्रकल्पातसुद्धा असे काही करू असे सुचविले आणि मग राम सुतार यांना कामं मिळू लागली. त्यांचा दिल्लीजवळील निवास व स्टुडिओ याचा सुद्धा राजकीय पुढाऱ्यांची कामे मिळण्यात उपयोग झाला. भारतातील अनेक राजकीय नेते सुतार यांच्या हातून घडले आणि जनमानसात कायमचे नोंदले गेले. यात वाजपेयी, बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल, महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज अशी मोठी यादी आहे. गेल्या ५०-६० वर्षांच्या काळात सुतार यांच्याकडून हजारोंच्या संख्येत शिल्पांची निर्मिती झाली आहे. त्यात व्यक्ती शिल्प, देवतांची शिल्प, स्मारकशिल्प, म्युरल्स असे अनेक प्रकार आहेत. येत्या काळात त्यांची काही महाकाय स्वरूपाची स्मारकशिल्प पूर्ण होऊन सर्वांना पाहायला मिळतील.
राम सुतार यांचे पुत्र अनिल सुतार हे एक आर्किटेक्ट आहेत. त्यांनी एक फार सुंदर कल्पना मांडली. त्यांनी राम सुतार यांची शिल्प एकत्र पाहायला मिळावीत म्हणून सुरजकुंड भडकाल रोडवर आनंदवन या नावाने एक शिल्प उद्यान तयार केलं. सुंदर हिरव्या ग्रॅनाइटच्या पार्श्वभूमीवर इथे सुतार यांच्या शिल्पांच्या प्रतिकृती पाहायला मिळतात. शिल्पकला ही प्रत्यक्ष भौतिक माध्यम वापरून केली जाणारी कला आहे. त्यात अनेक तास काम करण्याची शारीरिक क्षमता आणि अनेक माध्यमं हाताळायची क्षमता हे दोन्ही असावं लागतं. सुतार पिता-पुत्रांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर, इतक्या मोठ्या आकाराची शिल्प घडवण्यासाठी आवश्यक जागा, मनुष्यबळ, कौशल्यपूर्वक काम करणारे हात, यंत्रसामुग्री, तंत्रज्ञान यांची सांगड घालू शकणारे व्यवस्थापन याची उत्कृष्ट बांधणी केली आहे. म्हणूनच इतर सर्व शिल्पकारांपेक्षा त्यांचे काम सर्वदूर पोहोचायला मदत झाली. या व्यवस्थापनाने राम सुतार यांनी शिल्पकला आणि तिचा व्यवसाय यात एक नवा आदर्श निर्माण केला आहे, जो पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देईल.
-चित्रकार व कला अभ्यासक