मराठी-अमराठी भेदाभेद आम्ही मानत नाही! शिवसेना नेते अरविंद सावंत यांचे प्रतिपादन

मुंबईसह महाराष्ट्रात मराठी-अमराठी असा भेदाभेद आम्ही मानत नाही. मुस्लिम द्वेष म्हणजे हिंदुत्व नाही. आमचे हिंदुत्व हे धर्माधिष्ठित नाही तर राष्ट्राधिष्ठित आहे. आमचे राजकारण हे सर्वसमावेशक असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेवर आमचीच सत्ता येणार आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी केले.
अरविंद सावंत (संग्रहित छायाचित्र)
अरविंद सावंत (संग्रहित छायाचित्र)
Published on

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात मराठी-अमराठी असा भेदाभेद आम्ही मानत नाही. मुस्लिम द्वेष म्हणजे हिंदुत्व नाही. आमचे हिंदुत्व हे धर्माधिष्ठित नाही तर राष्ट्राधिष्ठित आहे. आमचे राजकारण हे सर्वसमावेशक असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेवर आमचीच सत्ता येणार आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी केले. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला काहीच दिवस शिल्लक असताना, शिवसेना (उबाठा)चे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई दक्षिण मतदारसंघातून तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले अरविंद सावंत यांनी सोमवारी दैनिक ‘फ्री प्रेस जर्नल’ आणि ‘नवशक्ति’च्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांना हात घालत शिवसेनेची (उबाठा) भूमिका स्पष्ट केली.

ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे मुंबईच्या राजकारणावर काय परिणाम होईल?

ठाकरे बंधूंचे एकत्र येणे हे तळागाळातील कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी असून भावनिक बळ देणारे आहे, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. बीएमसीमध्ये सर्वाधिक काळ आमची सत्ता राहिली आहे.

यापूर्वी भाजपसोबत युती होती, आता मनसेसोबत आहे. ही युती ‘भूमिपुत्रां’साठी आहे. याचा अर्थ फक्त मराठी समाज नव्हे, तर मुंबई आणि महाराष्ट्रात जन्मलेले व अनेक वर्षे वास्तव्यास असलेले सर्व लोक. शिवसेना (अखंड) ही रुग्णवाहिका सेवा सुरू करणारा एकमेव राजकीय पक्ष आहे. रुग्ण कोणत्या धर्माचा किंवा समाजाचा आहे, हे आम्ही कधी पाहिले नाही. सार्वजनिक सेवा देताना सर्व नागरिक आमच्यासाठी समान आहेत.

पालिका निवडणुकांत किती जागा जिंकण्याची अपेक्षा आहे?

जागांच्या संख्येवर बोलण्यापेक्षा मी एवढेच सांगू इच्छितो की, ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर ज्या पातळीवर जल्लोष झाला, तो अभूतपूर्व होता. मागील वर्षी लोकसभा निवडणुकांत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले होते, मात्र विधानसभा निवडणुकांत पराभव पत्करावा लागला.

दोन्ही निवडणुकांत जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. पण ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या घोषणेनंतरचा जल्लोष वेगळ्याच पातळीवरचा होता, जो इतर कोणत्याही निवडणूक विजयात पाहायला मिळाला नव्हता. त्यांनी मने जिंकली आहेत- हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. यश आपोआप येईल.

तुमच्या पक्षाने गेल्या अनेक वर्षांत मुंबईसाठी कोणती मोठी कामे केली आहेत?

मुंबईकरांना २४ तास पाणी मिळते. अप्पर वैतरणा धरणामुळे हे शक्य झाले आहे, हे अनेकांना कळतही नाही. धरणाच्या कामकाजात अनेक अडथळे आले, पण ठाकरे साहेबांनी मुंबईला पुरेसे पाणी मिळेल, याची खात्री केली. शिक्षण आणि आरोग्य सेवा पुरवण्यात बीएमसी ही देशातील सर्वात प्रगत महापालिका आहे. बीएमसीने चालवलेली रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये- केईएम, नायर- येथे प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा असते.

कारण येथे मोफत दिल्या जाणाऱ्या अतिविशेष उपचार सेवा आणि दर्जेदार वैद्यकीय शिक्षण. बीएमसीच्या सीबीएसई, आयबी शाळा आणि व्हर्च्युअल शिक्षण सुरू करणे हे आदित्य ठाकरे यांचे स्वप्नवत प्रकल्प होते. दुर्दैवाने, सध्याचे सरकार नागरी रुग्णालयांच्या सेवांचे खासगीकरण करण्याच्या दिशेने जात आहे. ही सामान्य माणसांची लूट आहे.

हिंदुत्व हीच पक्षाची विचारधारा राहील का?

बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की हिंदुत्व म्हणजे राष्ट्रवाद. जो या देशात राहतो, देशावर प्रेम करतो आणि देशासाठी बलिदान देण्यास तयार असतो, तो राष्ट्रवादी आहे.

आम्ही दुहेरी भूमिका घेत नाही- एकीकडे ख्रिसमसला चर्चमध्ये जाणे आणि दुसरीकडे कार्यकर्त्यांकडून सामान्य लोकांना ख्रिसमस साजरा करण्यापासून रोखणे. बाळासाहेबांनी नेहमीच सर्व धर्माच्या लोकांना पक्षात सहभागी होण्यासाठी आणि देशासाठी काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले.

logo
marathi.freepressjournal.in