ठाकरेंनी मुंबईत दोन जागा सोडल्या : परस्पर घोषणा अमान्य - पटोले

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील एकूण ६ जागांपैकी ४ जागांवर उमेदवार जाहीर केले आणि २ जागा मित्रपक्षांसाठी सोडल्या. त्यामुळे यावर काँग्रेस, राष्ट्रवादीने निर्णय घ्यावा आणि ते जर उमेदवार देत नसतील, तर आम्ही आमचे उमेदवार देऊ, असे म्हटले आहे. वाटाघाटीत ज्या चार जागा ठरल्या, त्या जागांवर आम्ही उमेदवार दिले आहेत.
ठाकरेंनी मुंबईत दोन जागा सोडल्या : परस्पर घोषणा अमान्य - पटोले

विशेष प्रतिनिधी/मुंबई

एकीकडे महायुतीत जागावाटपाचा तिढा सुटत नाही, तर दुसरीकडे महाविकास आघाडीतही मतभेद कायम आहेत. सांगलीच्या जागेचा वाद टोकाला गेला आहे. या जागेवर शिवसेनेने परस्पर उमेदवार जाहीर केल्याने माजी मंत्री विश्वजित कदम आक्रमक झाले असून काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीने राजीनाम्याचा इशारा दिला आहे.

दुसरीकडे शिवसेनेने आज मुंबईतील दोन जागा मित्रपक्षांसाठी सोडल्या असून, या जागांवर मित्रपक्ष लढले नाही, तर आम्ही त्या जागेवरही उमेदवार जाहीर करू, असे स्पष्ट केले आहे. त्यावर काँग्रेसनेही आक्रमक पवित्रा घेतला असून, महाविकास आघाडी म्हणून आम्ही जिंकण्याच्या निकषावर जागावाटप करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे यावर चर्चेतून मार्ग काढू, अशा परस्पर घोषणा अमान्य आहेत, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील एकूण ६ जागांपैकी ४ जागांवर उमेदवार जाहीर केले आणि २ जागा मित्रपक्षांसाठी सोडल्या. त्यामुळे यावर काँग्रेस, राष्ट्रवादीने निर्णय घ्यावा आणि ते जर उमेदवार देत नसतील, तर आम्ही आमचे उमेदवार देऊ, असे म्हटले आहे. वाटाघाटीत ज्या चार जागा ठरल्या, त्या जागांवर आम्ही उमेदवार दिले आहेत. पण, उत्तर मुंबई आणि उत्तर-मध्य मुंबईत उमेदवार दिले नाहीत. त्यामुळे मित्रपक्षांनी तिथे उमेदवार द्यावेत, तिथे आमचे कार्यकर्ते ही जागा शिवसेनेचीच असल्याप्रमाणे मेहनतीने प्रचार करतील, असे ठाकरे म्हणाले. त्यामुळे महाविकास आघाडीतही जागावाटपावरून टोकाचे मतभेद असल्याचे चित्र आहे. त्यामुळे यातून ज्येष्ठ नेते शरद पवार कसा मार्ग काढतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे. अगोदरच कॉंग्रेसने सांगलीसह दक्षिण-मध्य मुंबई आणि भिवंडीच्या जागेवरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यापैकी सांगलीवरून तर टोकाचा वाद सुरू झाला आहे. प्रत्यक्षात माजी मंत्री विश्वजित कदम कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींवरच नाराज असून, त्यांनी थेट कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहून जोपर्यंत सांगलीचा तिढा सुटत नाही, तोपर्यंत मी कॉंग्रेसच्या बैठकीला हजर राहणार नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे ही अंतर्गत नाराजी कॉंग्रेसला महागात पडेल, असे बोलले जात आहे.

गुणवत्तेनुसा जागावाटप

मुळात कोणत्या पक्षाने किती जागा लढायच्या, यापेक्षा गुणवत्तेवर जागावाटप ठरलेले आहे. महाविकास आघाडीत त्याच मुद्यावरून आतापर्यंत जागावाटप झालेले आहे. परंतु, शिवसेनेने काही ठिकाणी परस्पर घोषणा केली. त्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. मुळात कोणत्या पक्षाने किती जागा लढाव्या, हे ठरलेलेच नाही. तिथे कोण जिंकू शकतो आणि त्या पक्षाची किती ताकद यावर आधारित चर्चा झालेली आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. परंतु, ज्येष्ठ नेते शरद पवार यावर मार्ग काढतील, असा विश्वास नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

logo
marathi.freepressjournal.in