अजित जगताप
वाई : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण काशी समजणाऱ्या वाई येथून राष्ट्रवादीने घरभेद्यांच्या विरोधात तुतारी फुकली आहे. शरद पवार यांचे बालमित्र खासदार श्रीनिवास पाटील यांनीच या घरभेद्यांना रोखण्यासाठी आता आवाज उठवल्यामुळे राष्ट्रावादी काँग्रेस पक्षातील फुटीर गटामध्ये अस्वस्थता पसरली आहे.
वाई येथील साठे मंगल कार्यालयात झालेल्या या मेळाव्याला वाई-खंडाळा- महाबळेश्वर तालुक्यातील निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुकाध्यक्ष दिलीप बाबर यांनी स्वागत केले. त्यावेळी खासदार पाटील यांनी आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये समाचार घेताना सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे अनेकांना संधी मिळाली. या संधीचे त्यावेळी त्यांनी सोनं केलं, पण आता राजकारणामध्ये स्वतःला कसं सोनं मिळेल. सत्तेच्या भीतीपोटी काहीजण येथून निघून गेले आहेत. आता त्यांचे परतीचे दोर कापलेले आहेत. मतदारांच्या मनातील कौल दाखवण्यासाठी सर्वांनी सामुदायिक प्रयत्न केले पाहिजेत.
या कार्यक्रमाला खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रथमच आपली भूमिका स्पष्ट करताना ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्यासोबत असलेली बालमैत्री खासदार श्रीनिवास पाटील यांनी दाखवून दिली. त्यांच्या भाषणामुळे चांगलीच प्रेरणा मिळालेली आहे. कोणत्याही घरभेदी नेत्याचं नाव न घेता प्रमुख वक्त्यांनी तोफ डागली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीपेक्षा पक्षातील घरभेद्यांना रोखण्यासाठी सज्ज झालेले आहे. हे वाई विधानसभा मतदारसंघात स्पष्टपणे जाणवले. वाई मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री व आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरचिटणीस राजकुमार पाटील, युवा नेते सारंग पाटील, ॲड. विजयसिंह पिसाळ, प्रसाद सुर्वे, यांच्यासह ग्रामीण भागातून आलेले अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
वाई-खंडाळा-महाबळेश्वर या तीन तालुक्याचा मिळून एक मतदारसंघ झालेला आहे. या विधानसभा मतदारसंघांमध्ये मदनराव पिसाळ आप्पा यांनी अपक्ष म्हणून बाजी मारली. त्यानंतर अपक्ष म्हणून मदन भोसले यांनी सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीत यश मिळवले होते. आता राजकीय संपूर्ण समीकरण बदलले आहे. आता राजकीय विरोधक महायुतीच्या माध्यमातून एकत्र आलेले आहेत. पण मतदारांना हा निर्णय पचलेला नाही. याची चुणूक या मेळाव्यात पाहण्यास मिळाली.
या मेळाव्याला प्रकाश पिसाळ, कैलास पाटील, निखिल चव्हाण, विजय जगताप, नरेश सोनवले, आण्णा खामकर, प्रदीप सावंत, संदीप कांबळे, जयवंत बाबर, कृष्णा सावंत, निलेश ढेरे व वाई, लोणंद, खंडाळा, पारगाव, शिरवळ, महाबळेश्वर परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित होते.