अतुल जाधव
ठाणे : शिवसेना की भाजप यांचे अजूनही ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवाराबद्दल नक्की ठरत नसल्याने महायुतीकडून कोणती घोषणा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेना यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू असल्याने दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मात्र संभ्रमात आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिवसेना पक्षाच्या उमेदवांची पहिली यादी अखेर जाहीर करण्यात आली असून या पहिल्या यादीत अपेक्षेप्रमाणेच ठाणे, कल्याण, नाशिक या तीन प्रमुख जागांसह अन्य काही जागांचा पेच कायम आहे.
विशेष म्हणजे ठाणे आणि कल्याण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असताना भाजपच्या दबाव तंत्रामुळे सत्तेत महत्त्वाचे वाटेकरी असतानाही शिंदेंच्या शिवसेनेला आणि पर्यायाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या दोन जागांवर उमेदवार देता आलेला नाही. कल्याण किंवा ठाणे यापैकी एका जागेवर भाजपचा दावा कायम आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आणि कल्याणचे विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याबाबत स्वतः मुख्यमंत्र्यांना कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायचा नसल्याने त्यांना कोणत्या मतदारसंघात उमेदवारी द्यायची याचा तिढा देखील मुख्यमंत्र्यांना सोडवता आलेला नाही. परिणामी भाजपच्या या खेळीमुळे मुख्यमंत्र्यांना भाजपने कल्याण दरवाजात गाठल्याची चर्चा सुरू आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने गुरुवारी अखेर आपली पहिली यादी जाहीर केली असून यामध्ये सर्व विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे केंद्रात आणि राज्यात सत्तेत प्रमुख पक्ष असलेल्या भाजपने आपला नियोजित कार्यक्रम सुरू ठेवून उमेदवारांची यादी जाहीर करण्यातही आघाडी घेतली आहे. आपल्याला लोकसभेची उमेदवारी मिळणार का? यावरून सध्या शिवसेनेच्या खासदार आणि इच्छुकांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे.
नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी तर आपल्याला तिकीट मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानाच्या बाहेर आपल्या कार्यकर्त्यांसह शक्तिप्रदर्शन केले होते. यावेळी कोणावरही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देऊनही गोडसे यांनी पुन्हा मुंबईतील वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. राज्यात तीन पक्षांचे सरकार असले तरी आपला मूळ पक्ष सोडून शिंदे गटात सामील झालेल्या राजकीय मंडळींची मदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच असल्याने या सर्व मंडळींचे पुनर्वसन करण्याचे मोठे आव्हान शिंदे यांच्यासमोर आहे. त्यात अजित पवार सत्तेत सामील झाल्याने शिवसेनेच्या जागा कमी झाल्याने त्याचा देखील मोठा फटका शिंदेच्या शिवसेनेला बसला आहे.
ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघ हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बालेकिल्ले असूनही या दोन मतदारसंघांतही त्यांना त्यांच्या पक्षाचे उमेदवार अद्याप जाहीर करता आलेले नाहीत. यापैकी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे हे करत आहेत.
ठाणे किंवा कल्याण यापैकी एका जागेसाठी भाजपचा आग्रह कायम आहे. त्यामुळे कोणता मतदारसंघ भाजपला सोडावा आणि कोणता मतदारसंघ आपल्याकडे ठेवावा, याबाबत शिंदेेंच्या शिवसेनेत अजूनही एकमत होईना. कल्याणमध्ये भाजप आणि शिवसेनेतील विस्तव अजूनही मिटलेला नाही. मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून भाजपची ताकद या मतदारसंघात आहे. दुसरीकडे गणपत गायकवाड यांच्या प्रकरणानंतर भाजपचे कार्यकर्ते श्रीकांत शिंदे यांना कल्याणमध्ये उमेदवारी दिल्यानंतर त्यांचे काम करतील का? असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांना कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी द्यायची, याबाबत अद्याप निर्णय घेता आलेला नाही.
कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली असली तरी भाजप कार्यकर्त्यांकडून अद्याप सुरात सूर मिसळला जात नसल्याने श्रीकांत शिंदे यांचे टेन्शन वाढले आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून देखील कल्याण लोकसभेसाठी सक्षम उमेदवाराचा शोध सुरूच आहे. रोज नवीन नावाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे या जागेचा तिढा वाढत चालला आहे.
ठाणे लोकसभेसाठी शिवसेनेकडून रवींद्र फाटक, प्रताप सरनाईक आणि नरेश म्हस्के यांच्या नावाची चर्चा आहे. तर हे मतदार संघ भाजपला गेल्यास संजीव नाईक यांच्या नावाची सध्या चर्चा आहे. लोकसभेसाठी भाजपने महाराष्ट्रात मिशन ४८ पेक्षा अधिक जागांचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे राज्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात उमेदवार जाहीर करण्यापासून किंवा एखादा उमेदवार भाजपने जाहीर केल्यास त्यांना निवडणून आणण्यापासूनची जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांवरच असल्याने भाजपच्या या दबाव तंत्रामुळे त्यांच्याच बालेकिल्ल्यात मुख्यमंत्र्यांचीच कोंडी झाल्याचे चित्र सध्या तरी निर्माण झाले आहे असे बोलले तर वावगे ठरणार नाही.