महायुतीत तिढा; शिंदे गटात नाराजी

भाजप आणि शिवसेनेत टोकाचा संघर्ष वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन ही जागा राष्ट्रवादीला सोडण्याचा मार्ग काढण्यात आला आणि तेथे थेट राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना तयारी करण्यास सांगितले. खुद्द भुजबळ यांनी तर आपल्याला थेट दिल्लीतून आदेश आल्याचे सांगितले. त्यामुळे या जागेचा वाद आता चांगलाच वाढला आहे.
महायुतीत तिढा; शिंदे गटात नाराजी
संग्रहित छायाचित्र, पीटीआय

विशेष प्रतिनिधी/मुंबई

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असताना महायुतीत काही जागांवरून असंतोष वाढत चालला असून, नाशिकची जागा सध्या केंद्रबिंदू ठरली आहे. नाशिकवर खरा दावा शिंदे गटाचा आहे. कारण तेथे हेमंत गोडसे हे शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत. परंतु ते निवडून येणार नाहीत, या कारणाने तेथे भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटानेही दावा ठोकला असून, तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे या जागेवरून मंगळवारी दिवसभर तिन्ही पक्षांच्या नेत्यांची धावाधाव सुरू होती. त्यामुळे कार्यकर्त्यांत संभ्रमाची स्थिती आहे.

नाशिकच्या जागेवर तिन्ही पक्षांनी दावा ठोकला आहे. नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले होते. तत्पूर्वी त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी तर थेट जाहीर कार्यक्रमात गोडसे यांची उमेदवारी जाहीर करून टाकली होती. त्यावरून महायुतीत बेबनाव वाढला होता. त्यानंतर भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी उमेदवारीसाठी जोर लावला. अगोदरच भाजपचे दिनकर पाटील यांनी मतदारसंघात तयारी सुरू केली. भाजप आणि शिवसेनेत टोकाचा संघर्ष वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन ही जागा राष्ट्रवादीला सोडण्याचा मार्ग काढण्यात आला आणि तेथे थेट राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना तयारी करण्यास सांगितले. खुद्द भुजबळ यांनी तर आपल्याला थेट दिल्लीतून आदेश आल्याचे सांगितले. त्यामुळे या जागेचा वाद आता चांगलाच वाढला आहे.

याच जागेवरून मंगळवारी सर्वच पक्षाच्या इच्छुकांची आणि नेत्यांची चांगलीच धावाधाव झाली. कारण वेळ कमी राहिला आहे आणि महायुतीतील सर्वच पक्षांच्या नेत्यांना उमेदवारी हवी आहे. त्यामुळे शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे मंगळवारी मुंबईत दाखल झाले. त्यांच्यासोबत शिवसेनेचेच दादा भुसेही मुंबईत दाखल झाले. यासोबतच राष्ट्रवादीचे छगन भुजबळही मुंबईत डेरेदाखल झाले. त्यामुळे या जागेवरून आता जोरदार रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे या जागेवरून वादाची ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

...तर गोडसे अपक्ष लढणार?

नाशिकमधून कोणाला उमेदवारी मिळणार, हे गुलदस्त्यात आहे. परंतु जर राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळाली, तर विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी अपक्ष लढण्याची तयारी केली असल्याचे समजते. त्यामुळे आता उमेदवारी कोणाला मिळणार, यावरून पुढील गणित ठरणार आहे. दरम्यान, शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी यावरून भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आणि सर्वांनीच युतीधर्म पाळावा, असे म्हटले आहे.

उमेदवार बदलाच्या चर्चेला जोर

एकीकडे उमेदवारीसाठी धावाधाव सुरू झालेली असतानाच हिंगोलीचे शिवसेनेचे उमेदवार हेमंत पाटील आणि हातकणंगलेचे शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांना भाजपने विरोध केला असून, तेथे उमेदवार बदलाच्या मागणीने जोर धरला आहे. त्यामुळे उमेदवार बदलाच्या चर्चेनेही जोर धरला आहे. परंतु शिवसेनेने याला विरोध केल्याने 'जैसे थे' स्थिती राहील, असे बोलले जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in