
राज्यातील राजकारणामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर उलथापालथ चालू आहे, राज्याबाहेरून काही सूत्र हलवली जात आहेत. तसेच दिल्ली दरबारी पण लवकरच याची प्रतिक्रिया उमटेल असे चित्र असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सर्व बंडखोर आमदारांना पुन्हा एकदा भावनिक साद घातली आहे. शिवसेनेतील अंतर्गत कलहामुळे महाविकास आघाडी सरकारचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शिवसेनेचे प्रबळ नेते आणि महाविकास आघाडीचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह बंड केले. हे सर्व जण आसाममधील गुवाहाटी येथील रॅडिसन हॉटेलमध्ये थांबले आहेत.
काय म्हणाले मुख्यमंत्री ?
"गेल्या काही दिवसांपासून तुम्ही गुवाहाटीत अडकले आहात. तुमच्याबद्दल दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. तुमच्यापैकी अनेकजण संपर्कात आहेत. तुम्ही अजूनही शिवसेनेत आहात. कुटुंबप्रमुख म्हणून मी तुमचा आदर करतो. मी तुम्हाला अगदी त्याच भावनेने सांगतो की, अजून वेळ गेलेली नाही. एकत्र बसून मार्ग काढूया. कोणाच्या भूलथापांना बळी पडू नका. शिवसेनेने दिलेला मान तुम्हाला कुठेही मिळू शकत नाही. आपण पुढे येऊन बोललो तर मार्ग मोकळा होईल.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या या आवाहनानंतर आता शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.