पाऊस नसल्याने भाज्या, पालेभाज्यांचे दर १०० रुपयांच्या घरात गेलेले असताना रोजच्या जेवणात अत्यावश्यक टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. अवघ्या तीन ते चार दिवसांत टोमॅटोचे दर १०० रुपयांवर गेले आहेत. त्यामुळे आता खायचं तरी काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. टोमॅटोचा पुरवठा अत्यंत कमी झाल्याने घाऊक व किरकोळ बाजारात त्याचे दर वाढले आहेत. किरकोळ बाजारात चार दिवसांत टोमॅटोने शंभरी पार केली.
वाशीच्या एपीएमसी बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले की, महागडे टोमॅटो येते काही महिने घ्यावे लागणार आहेत. मान्सूनमध्ये टोमॅटोचा पुरवठा अत्यंत कमी होतो. गेल्या आठवड्यापासून एपीएमसी बाजारात टोमॅटोचा पुरवठा अत्यंत कमी होऊ लागला आहे.
व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, देशाच्या विविध भागात उष्णतेच्या लाटा आल्या. त्याचा मोठा फटका टोमॅटो उत्पादकांना बसला. तसेच यंदा मान्सूनला उशीर झाल्याने त्याचाही फटका टोमॅटो उत्पादनाला बसला. तसेच यंदा पाऊस कमी पडण्याची शक्यता असल्याने अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोच्या पिकापासून दूर राहणे पसंद केले आहे.
गेल्या आठवड्यात घाऊक बाजारात टोमॅटो प्रति किलो १८ ते २८ रुपयांना मिळत होते. गुरुवारी त्याचा दर ४० ते ६० रुपये झाले, तर किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर ८० ते १०० रुपये किलो झाले. बाजारात पूर्वी ४० ते ५० ट्रक रोज येत होते. आता केवळ २५ ट्रक येत आहेत.
नेरूळ येथील गृहिणी मेघना जाधव म्हणाल्या की, सर्व भाज्यांचे दर ६० ते ८० रुपये किलो झाले आहेत. आता रोजच्या जेवणातील टोमॅटो महाग झाला आहे. त्याचे दरमहिन्याचे किचनचे बजेट कोसळणार आहे.
५० ते ६० टक्के पुरवठा घटला
व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, टोमॅटोचा पुरवठा ५० ते ६० टक्के घटला आहे. मुंबई, नवी मुंबईला रोज ३०० टन टोमॅटो लागतो. ही टोमॅटोची गरज नाशिक, सातारा जिल्ह्यातून भागवली जाते. सध्या बाजारात रोज १०० टन टोमॅटोची आवक होत आहे.