प्रसिद्ध कवयित्री आसावरी काकडे यांचे निधन

प्रसिद्ध कवयित्री आसावरी काकडे यांचे निधन

साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या साहित्यिक, मराठी-हिंदीतील प्रसिद्ध कवयित्री, अनुवादिका आसावरी काकडे यांचे सोमवारी रात्री उशिरा अल्पशा आजाराने निधन झाले.
Published on

पुणे : साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या साहित्यिक, मराठी-हिंदीतील प्रसिद्ध कवयित्री, अनुवादिका आसावरी काकडे यांचे सोमवारी रात्री उशिरा अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ७७ वर्षांच्या होत्या. त्यांच्यामागे पती श्रीनिवास काकडे हे आहेत. मंगळवारी सकाळी दहा वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आसावरी काकडे यांचा जन्म २३ जानेवारी १९४९ साली झाला. त्यांनी बी. कॉम.नंतर मराठी आणि तत्त्वज्ञान या दोन विषयांत एमए केले. मराठी व हिंदीचे काव्यदालन समृद्ध करीत दोन्ही साहित्यामध्ये त्यांनी आपली स्वतंत्र ओळख तयार केली. ‘मेरे हिस्से की यात्रा’ हा आसावरी काकडे यांनी स्वत:च्याच निवडक कवितांचा केलेला हिंदी अनुवाद प्रसिद्ध आहे. स्वरचित कवितांशिवाय डॉ. विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या निवडक हिंदी कवितांचा ‘तरीही काही बाकी राहील’ या नावाने, तर दीप्ती नवल यांच्या ‘लम्हा लम्हा’ या हिंदी कवितासंग्रहाचा त्याच नावाचा अनुवादही साहित्यसृष्टीत रसिकप्रिय ठरला.

‘बोल माधवी’साठी साहित्य अकादमी

डॉ. चंद्रप्रकाश देवल यांच्या ‘बोलो माधवी’ या हिंदी कवितासंग्रहाचा मराठीमध्ये ‘बोल माधवी’ या नावाने त्यांनी केलेला अनुवाद गाजला. याच पुस्तकासाठी २००६ मध्ये त्यांची ‘साहित्य अकादमी पुरस्कारा’साठी निवड झाली होती. त्यांनी लिहिलेली पुस्तक परीक्षणे, ललित लेख, कथा इ. गद्य साहित्य विविध नियतकालिकांतून प्रकाशित झाले आहे. त्यांचा आकाशवाणीवरील, दूरदर्शनच्या व विविध साहित्य संमेलनांच्या कविताविषयक कार्यक्रमात सहभाग असायचा. त्यांच्या अनेक हिंदी कवितांचा मराठी अनुवाद विविध नियतकालिकांतून प्रकाशित झाला आहे. ‘मौन क्षणों का अनुवाद’ या हिंदी कवितासंग्रहातील काही कवितांचा पंजाबी, मैथिली भाषेत अनुवाद करण्यात आला आहे. त्यांच्या काही मराठी कवितांचे राजस्थानी, हिंदी व इंग्रजी भाषेत भाषांतर झाले आहे. काकडे यांनी नवी दिल्ली येथील आकाशवाणीतर्फे आयोजित जयपूर येथील सर्वभाषी कविसंमेलनात मराठीचे प्रतिनिधित्व केले आहे.

साहित्याचा शाळा, विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश

काकडे यांच्या कविता महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सातवी, आठवी, अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या आणि पुणे-नाशिक येथील विद्यापीठांच्या कला शाखेच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी पुस्तकांत समाविष्ट केल्या गेल्या आहेत. गोवा विद्यापीठाच्या एमएच्या अभ्यासक्रमात ‘मराठीतील अनुवादित भारतीय साहित्य’ या विषयासाठी नेमलेल्या पाठ्यपुस्तकात ‘बोल माधवी’ या कवितासंग्रहाचा समावेश झाला आहे. पेंग्विन बुक्सद्वारा प्रकाशित ‘नव्या वाटा, नवी वळणे’ या डॉ. निशिकांत मिरजकर यांनी संपादित केलेल्या प्रातिनिधिक मराठी कवींच्या कवितासंग्रहात त्यांच्या पाच कविता आहेत. त्यांच्या ‘खोद आणखी थोडेसे....’ ही ‘लाहो’ या कवितासंग्रहातील कविता महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी मराठी प्रथम भाषेच्या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे.

विविध पुरस्कार आणि सन्मान

काकडे यांच्या ‘आरसा’ काव्यसंग्रहाला महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला. याशिवाय महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ह. स. गोखले पुरस्कार, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा विशाखा प्रथम पुरस्कार असे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. ‘लाहो’ या काव्यसंग्रहासाठी महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचा ग.दि.मा. पुरस्कार, मेरे हिस्से की यात्रा या पुस्तकासाठी महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा संत नामदेव पुरस्कार, बालसाहित्यासाठी ग. ह. पाटील पुरस्कार, साहित्यिक योगदानाबद्दल गो. नी. दांडेकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा मृण्मयी पुरस्कार, ‘इसीलिए शायद’साठी नवी दिल्ली येथील केंद्रीय हिंदी निदेशालयाचा ’हिंदीतर भाषी हिंदी लेखक पुरस्कार’ अशा विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

काकडे यांचे साहित्य

अनु मनु शिऊ-बालकविता संग्रह, आकाश, आरसा हे कवितासंग्रह, इसीलिए शायद- हिंदी कवितासंग्रह, ईशावास्यम् इदं सर्वम्...एक आकलन-प्रवास तत्त्वज्ञानविषयक गद्य, उत्तरार्ध कवितासंग्रह, ऋतुचक्र बालकविता संग्रह, कवितेभोवतीचा अवकाश-लेखसंग्रह, जंगल जंगल जंगलात काय ?, टिक टॉक ट्रिंग-बालकविता संग्रह, तरीही काही बाकी राहील, हे त्यांचे प्रकाशित साहित्य आहे. ‘मिळून साऱ्याजणी’ या मासिकातही त्यांनी लेखन केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in