Ashadhi Ekadashi 2026 : पंढरीच्या वाटेवर लाखो माऊली; विठ्ठल नामाने महाराष्ट्र दुमदुमला

आषाढी वारी ही केवळ पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेली धार्मिक यात्रा नसून, माणसाला जीवन जगण्याची नवी दृष्टी देणारी समृद्ध संस्कृती आहे.
Ashadhi Ekadashi 2026 : पंढरीच्या वाटेवर लाखो माऊली; विठ्ठल नामाने महाराष्ट्र दुमदुमला
Ashadhi Ekadashi 2026 : पंढरीच्या वाटेवर लाखो माऊली; विठ्ठल नामाने महाराष्ट्र दुमदुमला(Photo-X)
Published on

सुजित ताजणे / छत्रपती संभाजीनगर

आषाढी वारी ही केवळ पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेली धार्मिक यात्रा नसून, माणसाला जीवन जगण्याची नवी दृष्टी देणारी समृद्ध संस्कृती आहे. शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या या परंपरेत भक्ती, समता, शिस्त, संयम, सेवा, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो. त्यामुळे वारी ही केवळ आध्यात्मिक यात्रा न राहता जीवनमूल्यांची शिकवण देणारे एक मोठे विद्यापीठ असल्याची भावना अनेक वारकऱ्यांनी व्यक्त केली.

लाखो वारकरी एकाच ध्येयाने, ‘ज्ञानोबा-तुकाराम’ आणि ‘विठ्ठल-विठ्ठल’च्या अखंड नामगजरात पंढरीच्या दिशेने पायी वाटचाल करीत आहेत. एकमेकांना मदत करणे, अडचणीच्या वेळी आधार देणे, सर्वांना समान वागणूक देणे आणि सामूहिक जीवन जगणे, हीच वारीची खरी ओळख आहे. त्यामुळे वारीतून सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि माणुसकीचे दर्शन घडते. प्रत्येक थेंबाचे महत्त्व जपत पाणी बचतीचा संदेश वारकरी कृतीतून देतात. आजच्या पाणीटंचाईच्या काळात हा संदेश अधिक महत्त्वाचा ठरतो. अन्नाबाबतही वारकरी संयमाचे उदाहरण घालून देतात. जे मिळेल ते प्रसाद समजून स्वीकारणे, अन्नाची नासाडी न करणे आणि मिळालेले अन्न इतरांसोबत वाटून खाणे, हा संस्कार वारीत रुजतो.

गेल्या आठ वर्षांपासून आषाढी वारीत सहभागी होत आहे. दररोज २० ते २५ किलोमीटरचा पायी प्रवास करताना एक वेगळाच आनंद मिळतो. जीवन कसे जगावे, याची खरी शिकवण वारीने दिली. घरच्या जीवनात आपण ज्या पद्धतीने वागतो, त्यापेक्षा वारीतील जीवन पूर्णपणे वेगळे आहे. अर्धी भाकरी दुसऱ्याला देऊन मिळणारा आनंद केवळ वारीतच अनुभवता येतो. सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचे खरे दर्शन वारीत घडते. जीवन जगण्याचा खरा आनंद मला वारीतून मिळाला.

विष्णू वखरे

logo
marathi.freepressjournal.in