

पुणे : आषाढी वारी म्हटली की लाखो वारकरी, भक्तिभावाचा महासागर आणि त्याचबरोबर सुरक्षेचे मोठे आव्हान. मात्र, यंदा पुणे पोलिसांनी या आव्हानावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाची भक्कम ढाल उभी केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), ड्रोन, चेहरा ओळखणारी यंत्रणा, जीपीएस ट्रॅकिंग, अत्याधुनिक सीसीटीव्ही नेटवर्क आणि आठ हजारांहून अधिक पोलिसांच्या तगड्या फौजफाट्याच्या बळावर यंदाची वारी सुरक्षा व्यवस्थेत पार पडणार आहे. संशयित व्यक्ती कॅमेऱ्यात दिसताच नियंत्रण कक्षाला तत्काळ इशारा, गर्दी धोक्याच्या पातळीवर पोहोचताच एआय प्रणालीकडून स्वयंचलित अलर्ट आणि हवेतून ड्रोनची करडी नजर अशी चौफेर सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
९ ते १२ जुलैदरम्यान संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुणे शहरात मुक्कामी असतील. यंदा प्रथमच पालखी मार्गावर एकूण २४४ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित कॅमेरे कार्यरत राहणार आहेत. त्यापैकी संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर १२५, तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर १०१ कॅमेरे बसवण्यात आले आहेत. याशिवाय २८ फेशियल रेकग्निशन कॅमेऱ्यांद्वारे पोलिसांच्या अभिलेखातील सराईत गुन्हेगार किंवा संशयित व्यक्तींची ओळख पटवली जाणार आहे. पालखीच्या रथांवर आणि मिरवणुकीच्या पुढे-मागे १२ जीपीएस उपकरणे बसवण्यात आली आहेत.
महिला, पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शनमार्ग
महिलांच्या सुरक्षेला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. साखळी चोरी, पाकीटमारी, मोबाईल चोरी आणि महिलांची छेडछाड रोखण्यासाठी गुन्हे शाखेची साध्या वेशातील विशेष पथके पालखी मार्गावर तैनात राहतील.
विशेष पोलीस मदत केंद्रे
नाना पेठ, पालखी विठोबा मंदिर, निवडुंग्या विठोबा मंदिर, रामोशी गेट चौक आणि संत कबीर चौक.
असा आहे फौजफाटा
४ अपर पोलीस आयुक्त
१३ पोलीस उपायुक्त
३० सहाय्यक पोलीस आयुक्त
१८२ पोलीस निरीक्षक
५७० सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक
६ हजार ५५२ पोलीस कर्मचारी
राज्य राखीव पोलीस दलाच्या ३ तुकड्या
१ हजार २५० होमगार्ड
वारी बंदोबस्त एका नजरेत
२४४ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित कॅमेरे
२८ चेहरा ओळखणारी यंत्रणा
१२ जीपीएस उपकरणे
ड्रोन व अँटी ड्रोन प्रणाली कार्यान्वित
५ मोठी, १९ मिनी मोबाईल कमांड वाहने
५०० ठिकाणी ध्वनिक्षेपक व्यवस्था
३०० वॉकीटॉकी संच
३० डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर
५० हँड मेटल डिटेक्टर
१२ जलद प्रतिसाद पथके
६ स्फोटक शोधक व नाशक पथके
वारीदरम्यान नागरिकांना पालखीचे थेट स्थान, वाहतूक बदल, बंद रस्ते आणि पर्यायी मार्गांची माहिती डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणार आहे. सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सुरळीत वारीसाठी पुणे पोलीस पूर्णपणे सज्ज आहेत.
अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे