

मुंबई : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक असलेल्या यंदाच्या आषाढी वारीचा सोहळा डिस्कव्हरी आणि जिओग्राफी या आंतरराष्ट्रीय दूरचित्रवाहिन्यांद्वारे जगभर पोहोचणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली.
सरकारने वारीची सर्वंकष तयारी पूर्ण केली असून लाखो वारकऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संपूर्ण प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे. वारीत कोणत्याही वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देशही फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानभवनात पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या पूर्वतयारीबाबत आढावा बैठक झाली. पालखी मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती, राष्ट्रीय महामार्गावरील विकासकामे, मुक्कामस्थळी जर्मन हँगर, पाणी, स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षा यंत्रणा यांची सक्षम व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व प्रमुख पालख्यांच्या मुक्कामस्थळी प्रशस्त हँगर उभारण्यात आल्याने लाखो वारकऱ्यांना पावसाळ्यात सुरक्षित निवारा मिळणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
यावेळी पालखी सोहळा प्रमुखांच्या बहुतांश मागण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. विशेषतः महिला वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुक्कामस्थळी विशेष उपाययोजना करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली.
डिजेमुक्त वारीसाठी प्रयत्न
दरम्यान, पुणे विभागाबाहेरील पालख्यांनाही समान सुविधा मिळाव्यात यासाठी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची नोडल पालकमंत्री आणि पुणे विभागीय आयुक्त यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. डीजेमुक्त आणि पारंपरिक वारीसाठी पोलीस प्रशासनाने सर्व घटकांशी समन्वय साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.
आषाढी वारीसाठी प्रशासन सज्ज
पालखी मार्गावरील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती
सर्व प्रमुख मुक्कामस्थळी जर्मन हँगरची उभारणी
महिला वारकऱ्यांसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था
स्वच्छता, आरोग्य, पाणी आणि पोलीस यंत्रणांचा समन्वित आराखडा
₹ डीजेमुक्त, पारंपरिक आणि सुरक्षित वारीवर शासनाचा भर