"पेंग्विन सेनेचा पायगुण पाहिलात का?", 'इंडिया' आघाडीच्या बिकट परिस्थितीवरुन आशिष शेलारांची बोचरी टीका

विरोधकांनी 'इंडिया' आघाडीचा प्रयोग केल्यानंतर ही आघाडी भाजपसह एनडीएला चांगली टक्कर देईल असे वाटले होते. मात्र...
"पेंग्विन सेनेचा पायगुण पाहिलात का?", 'इंडिया' आघाडीच्या बिकट परिस्थितीवरुन आशिष शेलारांची बोचरी टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपची घोडदौड रोखण्यासाठी देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी मिळून 'इंडिया' आघाडीची स्थापना केली. महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे यांची शिवसेनाही इंडिया आघाडीचा घटक आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून इंडिया आघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र आहे. यावरुन मुंबई भाजपचे अध्यक्ष, आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. शेलार यांनी, संजय राऊत आणि पेंग्विन सेनेच्या पायगुणामुळे हे सगळे होत आहे, अशा आशयाची पोस्ट करत राऊंतासह अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरेंवर टीका केली.

काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि आम आदमी पक्षाने अनुक्रमे पश्चिम बंगाल आणि पंजाबमध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबत कोणतीही आघाडी करणार नसल्याचे जाहीर करत स्वबळावर लढण्याचा नारा दिला. यानंतर काल (रविवारी) संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत महाआघाडी तोडत पुन्हा भाजपच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले. दुसरीकडे, महाराष्ट्रात असलेल्या महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा अजूनही अधिकृतपणे सहभाग झालेला नाही. यावरुन शेलार यांनी, 'हा संजय राऊत आणि पेंग्विन सेनेचा पायगुण' असल्याची पोस्ट करत बोचरी टीका केली आहे.

आशिष शेलार यांची पोस्ट-

"◆ ममता बॅनर्जींनी जाहीर केले पश्चिम बंगालमध्ये एकला चलो रे..

◆ केजरीवाल म्हणतात स्वबळावर लढणार

◆ वंचितच्या मनात अजून शंकाकुशंका शिल्लक आहेत किंचित

◆ मा. नितीश कुमार यांनी इंडिया आघाडी नावाच्या स्वार्थी कंपूला रामराम केला.

◆ श्रीमान संजय राऊत आणि पेंग्विन सेनेचा पायगुण पाहिलात का?

हे जिथे जिथे असतात तिथून लोक तातडीने निघून जातात !

◆◆ "मलपत्रातून" आम्हाला रोज शहाणपण शिकवण्यापेक्षा पेंग्विन सेनेने आपल्या विझत्या दिव्या खालचा अंधार बघावा!!"

यावेळी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या 'सामना' मुखपत्राचा उल्लेख 'मलपत्र' असा केला आहे. '"मलपत्रातून" आम्हाला रोज शहाणपण शिकवण्यापेक्षा पेंग्विन सेनेने आपल्या विझत्या दिव्या खालचा अंधार बघावा!!", असे शेलार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, विरोधकांनी 'इंडिया' आघाडीचा प्रयोग केल्यानंतर ही आघाडी भाजपसह एनडीएला चांगली टक्कर देईल असे वाटले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून आघाडीत सुरू असलेल्या उलथापालथेमुळे आणि नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आघाडीच्या भवितव्यावर प्रश्न निर्माण झाला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in