अशोक चव्हाण आणि संजय निरूपम यांची मुंबईत गुप्त भेट; राहुल गांधी मुंबईत येण्याआधी काँग्रेसला धक्का बसणार?

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपचे राज्यसभा खासदार आहेत. त्यांच्यानंतर काँग्रेसचे बरेच नेते भाजपमध्ये दाखल होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. आता त्यांनी हळूहळू आपली चाल खेळायला सुरुवात केली आहे.
अशोक चव्हाण आणि संजय निरूपम यांची मुंबईत गुप्त भेट; राहुल गांधी मुंबईत येण्याआधी काँग्रेसला  धक्का बसणार?

विशेष प्रतिनिधी/मुंबई

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपचे राज्यसभा खासदार आहेत. त्यांच्यानंतर काँग्रेसचे बरेच नेते भाजपमध्ये दाखल होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. आता त्यांनी हळूहळू आपली चाल खेळायला सुरुवात केली आहे. दरम्यान, उत्तर-पश्चिम मतदारसंघात महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेनेने दावा केला होता. परंतु जागावाटप जाहीर होण्याआधीच शिवसेनेने अमोल किर्तीकर यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे काँग्रेसचे संजय निरूपम यांनी नाराजी व्यक्त केली. त्यातच त्यांनी बुधवारी थेट खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतल्याने निरूपम भाजपमध्ये जाणार अशी चर्चा रंगली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय हालचाली वेगात सुरू झाल्या असून, मुंबईत भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. शिंदे गटाला केवळ एक जागा देऊन भाजप अन्य पाच जागांवर तयारी करत आहे. त्यापैकी उत्तर मुंबईत पियूष गोयल आणि उत्तर-पूर्व मुंबईत मिहीर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली. आता ३ जागांवर कोणाला उमेदवारी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाने अमोल किर्तीकर यांना उमेदवारी घोषित करताच माजी खासदार तथा काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, किर्तीकरांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत या जागेवरून वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात असतानाच माजी खासदार संजय निरूपम आणि माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांच्यात गुप्त भेट झाली. त्यामुळे चर्चेला उधाण आले असून, संजय निरूपम भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला उधाण आले. परंतु दोन्ही नेत्यांनी ही शक्यता नाकारली आहे. यावरून आता अमोल किर्तीकर यांना उमेदवारी जाहीर करणे महाविकास आघाडीसाठी महागात पडू शकते, असे बोलले जात आहे.

काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी चव्हाण यांची गुप्त भेट घेतली. त्यामुळे महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. त्यातच या भेटीबाबत विचारले असता या दोन्ही नेत्यांनी ही भेट मैत्रीपूर्ण असल्याचे सांगितले. संजय निरुपम म्हणाले की, “अशोक चव्हाण हे माझे जुने मित्र आहेत. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आमची भेट झाली. त्यामुळे या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये.” अशोक चव्हाण यांनीही माझे काँग्रेसचे सबंध जुने आहेत. त्यामुळे भेट होतच असते, असे सांगितले. मात्र, या भेटीमागे राजकीय गणित आखले जात असल्याचे बोलले जात आहे.

राहुल गांधी मुंबईत येण्याआधी धक्का?

नुकतेच भाजपमध्ये सामील झालेले अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे माजी खासदार संजय निरूपम यांच्यात बुधवारी मुंबईत भेट झाल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. राहुल गांधी यांची न्याय यात्रा मुंबईत येण्याअगोदर संजय निरूपम बॉम्ब फोडणार का, अशीही चर्चा रंगली आहे. उत्तर-पश्चिम मुंबईत भाजपकडे उमेदवार नाही. त्यामुळे निरूपम यांचा विचार होऊ शकतो, असेही बोलले जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in