अशोक चव्हाण यांच्या प्रचारसभेत मराठा समाजाचा गोंधळ; वाचा नेमके काय घडले?

नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या एका प्रचारसभेत सखल मराठा समाजाने गोंधळ घातला.
अशोक चव्हाण यांच्या प्रचारसभेत मराठा समाजाचा गोंधळ; वाचा नेमके काय घडले?
Published on

नांदेड : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सभा आणि रॅलीच्या माध्यमातून उमेदवारांचा प्रचार करत आहे. नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या एका प्रचारसभेत सखल मराठा समाजाने गोंधळ घातला. यावेळी अशोक चव्हाण यांच्या प्रचारसभेत मराठा समाजाने 'एक मराठा लाख मराठा' अशा घोषणाबाजी देखील केली. परंतु, अशोक चव्हाण यांनी प्रसंगावधान राखत मराठा समाजाचे म्हणणे ऐकून घेतले. यानंतर मराठा समाजाचे आंदोलक शांत झाल्यानंतर अशोक चव्हाणांनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली.

अशोक चव्हाण हे गुरुवारी (१८ एप्रिल) नांदेड मधील मुखेड तालुक्यातील जांब येथे महायुतीच्या उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारसभेसाठी गेले होते. त्यावेळी काही सखल मराठा समाजाच्या आंदोलकांनी अशोक चव्हाण यांच्या प्रचारसभेत गोंधळ घातला. त्यावेळी अशोक चव्हाण म्हणाले की, माझे भाषण संपल्यानंतर चर्चा करू", असे म्हणाले होते. परंतु, मराठा समाजाचे आंदोलक थांबण्यास तयार नव्हते. त्यावेळी अशोक चव्हाण यांनी भाषण थांबविले आणि मराठा समाजाच्या आंदोलकांचे म्हणणे ऐकले आणि त्यांचे निवेदन घेतले. यानंतर अशोक चव्हाणांनी त्यांच्या प्रचारसभेला पुन्हा सुरू केल्याची माहिती त्यांनी ट्वीट करत दिली आहे.

अशोक चव्हाण यांनी ट्वीटमध्ये नेमके काय म्हणाले?

मराठा समाजाच्या गोंधळाबाबत अशोक चव्हाण यांनी ट्वीटमध्ये म्हणाले, "जांब, ता. मुखेड, जि. नांदेड येथे आज महायुतीची प्रचारसभा सुरू असताना सकल मराठा समाजाचे काही बांधव सभेत आले. त्यांचे निवेदन मी स्वीकारावे, अशी त्यांची मागणी होती. सभा संपल्यावर आपण चर्चा करू, अशी विनंती मी त्यांना केली. मात्र, आताच निवेदन स्वीकारावे असा त्यांचा आग्रह असल्याने भाषण थांबवून मी त्यांचे निवेदन स्वीकारले. त्यानंतर ते निघून गेले व सभा पुन्हा सुरू झाली."

मनोज जरांगे आणि अशोक चव्हाण यांची भेट

यापूर्वी अशोक चव्हाण यांना नांदेडमधील गावात मराठा समाजाने येण्यापासून रोखल्याच्या घटना घडल्या होत्या. तसेच अशोक चव्हाण यांनी महिन्या भरापूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. त्यावेळी मनोज जरांगे पाटील आणि अशोक चव्हाण यांच्या मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाल्याच्या बातम्या त्यावेळी आल्या होत्या.

logo
marathi.freepressjournal.in