अशोक खरातच्या कॉल डेटासाठी AI चा वापर; अंजली दमानियांचा दावा

अटकेतील स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू अशोक खरात याच्या कॉल डेटा रेकॉर्डचे (सीडीआर) विश्लेषण करण्यासाठी ‘क्लोड’ या कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित प्रणालीचा वापर केल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी केला. आपण कधीही बेकायदेशीर कृत्य करणार नाही, असे स्पष्ट करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केवळ सोयीचे राजकारण करत असल्याची टीकाही त्यांनी केली.
अशोक खरातच्या कॉल डेटासाठी AI चा वापर; अंजली दमानियांचा दावा
अशोक खरातच्या कॉल डेटासाठी AI चा वापर; अंजली दमानियांचा दावा
Published on

अटकेतील स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू अशोक खरात याच्या कॉल डेटा रेकॉर्डचे (सीडीआर) विश्लेषण करण्यासाठी ‘क्लोड’ या कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित प्रणालीचा वापर केल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी केला. आपण कधीही बेकायदेशीर कृत्य करणार नाही, असे स्पष्ट करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केवळ सोयीचे राजकारण करत असल्याची टीकाही त्यांनी केली.

खरात याच्या मोबाईलवरून कोणाला आणि किती फोन आले, हे शोधण्यासाठी ‘एआय’ मदत घेतल्याचे दमानिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. व्हॉट्सॲपवर खासगी गुप्तहेराकडून आपल्याला हा डेटा मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे. हा डेटा अधिकाऱ्यांसोबत शेअर करण्यापूर्वी आपण ‘एआय’ टूलच्या मदतीने त्याची पडताळणी केली होती, अशी माहिती त्यांनी दिली.

१८ मार्चपासून बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या खरात आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात १७ वेळा फोनवरून संवाद झाल्याचे त्यांनी नमूद केले. याशिवाय रुपाली चाकणकर, सुनील तटकरे, चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार या नेत्यांची नावेही त्यांनी घेतली आहेत.

मुख्यमंत्र्यावर टीका करताना दमानिया म्हणाल्या की, मुख्यमंत्री केवळ सोयीचे राजकारण करत असल्याने या विषयात त्यांच्याशी संपर्क साधण्यात अर्थ नाही. पार्थ पवार यांच्या मुंढवा जमीन प्रकरणात त्यांनी अहवाल तीन महिने दाबून ठेवला आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी तो प्रसिद्ध केला. हे लोक केवळ राजकारण करतात, त्यामुळे आता आपल्याला केवळ पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्याकडूनच अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. हा सर्व तपशील आपण पोलिसांना सादर केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची विनंती केल्याचेही त्यांनी शेवटी नमूद केले.

अजित पवार अपघाताचा संबंधाची चौकशी करावी

समता क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमधील व्यवहारांच्या एसएमएस अलर्टमध्ये संशयास्पद वाढ झाल्याचा दावाही दमानिया यांनी केला. २८ जानेवारी रोजी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता, त्या दरम्यानच्या व्यवहारांकडे त्यांनी लक्ष वेधले. २७ जानेवारी रोजी १७ संदेश आणि २८ जानेवारी रोजी १९ संदेश प्राप्त झाले होते, जे नेहमीच्या पद्धतीपेक्षा वेगळे होते. खरात यांच्या खात्यातील हे व्यवहार आणि पवार यांच्या अपघाताचा काही संबंध आहे का, याची चौकशी तपास यंत्रणांनी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in