

मुंबई : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातच्या मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी सुरू असून मोबाईलमधील डेटा परत मिळवला जात आहे. या डेटातून अशोक खरातच्या संपर्कात कोण होते, त्यांच्यात काय व्यवहार झाले, कोणत्या संदेशांची देवाण-घेवाण झाली, याची चौकशी केली जाईल. ज्या व्यक्तींच्या विरोधात पुरावा मिळेल त्या प्रत्येकाची चौकशी होईल, असे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरातला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांना धडा शिकवण्याचा निर्धार मंगळवारी विधानसभेत बोलून दाखवला. फडणवीस यांच्या निवेदनातून खरातशी संपर्क ठेवणारे सरकारी अधिकारी पोलिसांच्या रडारवर असल्याचे स्पष्ट झाले आहे .
गुन्ह्यांची विशेष तपास पथकामार्फत चौकशी
अंगात दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा करत धार्मिक विधीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत निवेदन केले. यावेळी त्यांनी भोंदूबाबा खरातने केलेल्या पापाचा पाढा वाचून दाखवला. खरातच्या प्रकरणात एकूण आठ गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांची विशेष तपास पथकामार्फत तसेच नाशिकच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून चौकशी सुरु आहे. खरातचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संगनमत आहे का? याचाही तपास पोलिसांकडून केला जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
गर्भवती महिलेवर अत्याचार
खरातने कोपाची भीती दाखवत एका महिलेवर वारंवार बलात्कार केला. नकली साप, नकली वाघ दाखवून भीती घातली. लघवी पाजून अघोरी प्रकार केले. फिर्यादी महिलेस दिवस गेल्याने गोळ्या देऊन गर्भपातही केला होता. पिडित महिलेला दिव्य जडीबुटीचे औषध दिले होते. खरात जे द्रव्य द्यायचा त्या द्रव्याची फॉरेन्सिक तपासणी करण्यात येत असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. पीडित महिलांचे व्हिडीओ आणि छायाचित्र मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांतून व्हायरल झाले आहेत. हे व्हिडीओ समाजमाध्यमातून काढून टाकण्याचे काम सुरु आहे. त्याशिवाय ज्या वृत्त वाहिन्यांनी पीडित महिलेची ओळख उघड केली, त्या वृत्त वाहिन्यांना नोटीस बजावण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
लोकांची फसवणुकीतून खरातची माया
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या निवेदनात खरातने लोकांची फसवणूक करून गोळा केलेल्या संपत्तीची माहिती दिली. खरातची नाशिक, सिन्नर, पुणे, नवी मुंबई अशा ठिकाणी प्लॉट, बंगले, मंगल कार्यालय आदी मालमत्ता आहे . स्वत:चे १२ तोळे, पत्नीचे २० तोळे सोने अशी एकूण आतापर्यंत ४० कोटी ८७ लाख रूपये बाजारमूल्याची मालमत्ता दिसून आली आहे. खरातच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या मालमत्तेची माहिती काढण्यात येत आहे. खरातने आयकर चोरी केली आहे का किंवा कर थकवला आहे काय याचाही तपास सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी खरातचे कोणकोणत्या बँकेत खाती होती याचा तपशील दिला. खरातने अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, युएई, दक्षिण आफ्रिका, इथोपिया, टांझानिया , केनिया, इंडोनेशिया, मलेशिया, पेरू, युगांडा, कंबोडिया आदी देशांचा प्रवास केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी निवेदनात दिली.
केवळ छायाचित्र आहे म्हणून चौकशी नाही
शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या भास्कर जाधव यांनी यावेळी ज्या अधिकाऱ्यांनी खरातला संरक्षण दिले त्यांच्यावर कारवाई करण्याचे आणि ज्या राजकारण्यांची खरातसोबत छायाचित्रे आहेत, त्यांची चौकशी करण्याची मागणी केली. त्यावर, आपण सगळेच राजकारणात आहोत. त्यामुळे कुणाबरोबर केवळ छायाचित्र आहे म्हणून त्याला आरोपी करता येणार नाही. मात्र ज्याच्या विरोधात पुरावा मिळेल त्याला सोडणार नाही, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. कायद्यानुसार न्यायालयाच्या अखत्यारित क्रिमिनल चौकशी करता येत नाही. न्यायालयच यावर स्वत: निर्णय घेऊ शकते, असे सांगून त्यांनी न्यायालयीन चौकशीची मागणी अमान्य केली.