खरातला २९ मार्चपर्यंत मिळाली पोलीस कोठडी; न्यायालय परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात धक्कादायक घडामोडी समोर येत आहेत. एसआयटीने त्याला नाशिक न्यायालयात हजर केले असता, सरकारी वकिलांनी ५ नरबळींचा संशय व्यक्त केला. कोर्टाने युक्तिवाद ऐकून खरातला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
खरातला २९ मार्चपर्यंत मिळाली पोलीस कोठडी; न्यायालय परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
खरातला २९ मार्चपर्यंत मिळाली पोलीस कोठडी; न्यायालय परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
Published on

नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात याच्या प्रकरणात रोज धक्कादायक माहिती पुढे येत आहे. अशोक खरात याला एसआयटीच्या पथकाने मंगळवारी नाशिक न्यायालयात हजर केले. यावेळी सरकारी वकिलांनी महत्त्वाचा युक्तिवाद मांडताना अशोक खरात याने ५ नरबळी दिल्याचा संशय व्यक्त केला. त्याच्या पिस्तूलातून ५ गोळ्या मिसिंग असल्यामुळे त्याने ५ नरबळी घेतल्याचा संशय बळावला आहे. तसेच आणखी काही महत्त्वाचे मुद्यांचा शोध घेण्याचे बाकी असल्याने त्याच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली. कोर्टाने सरकारी वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर खरातच्या वकिलांचाही युक्तिवाद ऐकला. नंतर कोर्टाने अशोक खरातला चार दिवसांची म्हणजेच २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायालयात आणण्यापूर्वी खरातची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता न्यायालय परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता,

प्राण्यांची कातडी, कस्तुरीबाबतची चौकशी बाकी

‘आरोपी अशोक खरातकडे प्राण्यांची कातडी, पांढरी कस्तुरी, काळी कस्तुरी आढळून आली होती. तसेच फार्म हाऊसमध्ये संपत्ती बाबतचे कागदपत्रे आढळून आली आहेत. त्याचबरोबर ‘डीव्हीआर’ही आढळून आला आहे. या डीव्हीआर’मध्ये काही होते का? तो फार्म हाऊसमध्ये का आणण्यात आला होता?, याबाबतची चौकशी करणे बाकी आहे, अशी माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिली.

जादूटोणा करत नव्हते : आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद

‘पोलिसांकडे ७ दिवस होते. ते आपला तपास पूर्ण का करु शकले नाहीत? जे घडत आहे त्याबाबत वाघाची कातडी, बंदूक आणि कस्तुरी विषयीचे प्रश्न आपल्याला विचारले नाहीत. अशोक खरात पूजा - विधी करत होते. पण जादूटोना करत नव्हते’, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला.

अत्याचार आणि फसवणुकीचे जाळे

तपासाधिकारी किरण सूर्यवंशी यांनी न्यायालयात सांगितले की, पीडित महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ६७ वर्षांचा हा आरोपी ३० वर्षांच्या मुलीवर अत्याचार करतानाचे पुरावे पुढे आले आहेत. खरात याच्या घरात राजमुद्रा आणि अनेक मालमत्तांची कागदपत्रे सापडली आहेत. त्याने संमोहनाच्या जाळ्यात ओढून अनेकांना आर्थिकरित्या फसविले आहे. अघोरी कृत्ये प्रतिबंधक कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई सुरू आहे. या गुन्ह्याची पाळेमूळे शोधण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात २९ मार्च पर्यंत सुनावण्यात आलेल्या पोलीस कोठडी दरम्यान पोलीस तपासत आणखी काय समोर येते? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

आरोपीने नाकारले सर्व आरोप

कोठडीचा आदेश देण्यापूर्वी न्यायाधीशांनी खरातला त्याचे काही म्हणणे आहे का, असे विचारले असता त्याने साप किंवा वाघांच्या कातडीच्या वापराबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. तो फक्त महाशिवरात्री किंवा श्रावणी सोमवार यासारख्या सणांना मंदिरात जात असे, जिथे मोठी गर्दी असायची, असे त्याने नमूद केले. गेल्या पाच दिवसांच्या कोठडीत आपण सर्व प्रश्नांची उत्तरे दिली असून आपल्यावर लावण्यात आलेल्या आरोपांबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचा पुनरुच्चार त्याने केला

५ नरबळी घेतल्याचा पोलिसांना संशय

‘आरोपीच्या घराच्या झडतीत राजमुद्रा सापडल्या आहेत. त्याने पिस्टलच्या माध्यमातून ५ नरबळी दिल्याचा संशय आहे, त्याचे पुरावे मिळाले आहेत. मालमत्तेची कागदपत्रे सापडली आहेत. अनेकांना त्याने फसविले आहे, त्याबाबतच्या तक्रारी पुढे येत आहेत. आरोपी ६७ वर्षांचा आहे. तो ३० वर्षांच्या मुलीवर अत्याचार करताना व्हिडीओत दिसतो आहे. त्याचे पिस्टल जप्त केले आहे’, अशी माहिती सरकारी वकिलांनी युक्तिवादात दिली. तसेच अशोक खरातने खडे कुठून आणले, भेटायला आलेल्यांना जे मिश्रित पाणी तो द्यायचा ते कुठून आणले, घरात २१ जिवंत काडतुसे सापडली असून ५ रिकाम्या काडतुसाच्या पुंगळ्या सापडल्या आहेत. तो कस्तुरी वापरत होता. ती हरणाची शिकार करून आणली आहे का? त्याचा तपास करायचा आहे. पीडित महिलांची संख्या वाढत आहे. या सर्व तपासासाठी पोलीस कोठडी हवी आहे. राज्यात अघोरी कृत्याचा कायदा असताना आरोपी ती कृत्ये करत होता’, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी कोर्टात केला.

logo
marathi.freepressjournal.in