

नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात याचा आणखी एक कारनामा ‘एसआयटी’ने उघड केला आहे. खरातच्या सातव्या गुन्ह्याचा तपास करत असताना त्याच्या 'ओकस' कार्यालयाची झडती घेण्यात आली. यावेळी भाविकांची आर्थिक लूट करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आणि एक धनादेश जप्त करण्यात आला. बाजारात साधारणपणे ५ हजार रुपयांना मिळणारी अंगठी खरात हा भोळ्याभाबड्या भाविकांना चक्क लाखो रुपयांना विकत असल्याची धक्कादायक माहिती यावेळी उघड झाली.
खरातच्या कार्यालयात स्टीलच्या कडीमध्ये अडकवलेली अंगठी बनवण्याची एकूण ३५ गोलाकार ‘मापे’ एसआयटीच्या हाती लागली. यावेळी तपासात असे समोर आले आहे की, भोंदू खरात आपल्या जाळ्यात अडकलेल्या भक्तांच्या आणि पीडित महिलांच्या बोटांचे माप घेऊन त्यांना विशिष्ट 'अंगठी' घालण्याचा सल्ला द्यायचा. अशा प्रकारच्या अंगठ्या उपलब्ध करून देताना खरातने लाखो रुपये उकळले. पथकाने कार्यालयातून एका महिलेच्या नावाचा मोठ्या रकमेचा धनादेश देखील जप्त केला आहे.
भक्तांच्या लूटीचे धागेदोरे पोलिसांच्या हाती
पूजेच्या विधीसाठी आणि समस्या निवारणासाठी खरात हा भक्तांकडून मोठी रक्कम उकळत असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. यापूर्वी खरातवर महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे गंभीर आरोप आहेतच, मात्र आता या पुराव्यांमुळे त्याने भक्तांची आर्थिक लूट कशा प्रकारे केली, याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. पीडित महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी तो या अंगठ्यांचा आणि पूजेचा वापर करत असे. एसआयटीने जप्त केलेले हे पुरावे न्यायालयात खरात विरोधात भक्कम आधार ठरणार आहेत.