खरातप्रकरणी ६३ कोटींचे संशयास्पद व्यवहार उघड; ED कडून ४२ लाखांची रोकड जप्त; नोटाबंदीच्या काळातील व्यवहारांचा तपास सुरू

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात ‘ईडी’ने नोटाबंदी काळातील संशयास्पद व्यवहार उघड केले. सिन्नर येथील सहकारी पतसंस्थेत त्याच्याशी संबंधित ३२ खात्यांमध्ये सुमारे १.८६ कोटी रुपये जमा करून त्याचे एफडीमध्ये रूपांतर करण्यात आले होते...
खरातप्रकरणी ६३ कोटींचे संशयास्पद व्यवहार उघड; ED कडून ४२ लाखांची रोकड जप्त; नोटाबंदीच्या काळातील व्यवहारांचा तपास सुरू
खरातप्रकरणी ६३ कोटींचे संशयास्पद व्यवहार उघड; ED कडून ४२ लाखांची रोकड जप्त; नोटाबंदीच्या काळातील व्यवहारांचा तपास सुरू
Published on

आशिष सिंग / मुंबई

भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास करताना ‘अंमलबजावणी संचालनालया'ने (ईडी) नोटाबंदीच्या काळातील संशयास्पद व्यवहारांचा शोध लावला आहे. नाशिकमधील सिन्नर येथील एका सहकारी पतसंस्थेत खरात याच्याशी संबंधित ३२ बँक खात्यांमध्ये सुमारे १.८६ कोटी रुपये जमा करण्यात आले होते. नोव्हेंबर २०१६ मध्ये ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्या होत्या, त्याच काळात ही रोकड जमा करून त्याचे मुदत ठेवींमध्ये (एफडी) रूपांतर करण्यात आल्याचे तपासात पुढे आले आहे.

या मुदत ठेवींची मुदत संपल्यानंतर २०२३-२४ दरम्यान सुमारे ३.१८ कोटी रुपये काढण्यात आले. हा पैसा बेनामी जमीन व्यवहारांसाठी वापरला गेल्याचा संशय ‘ईडी’ला आहे. त्याशिवाय अहिल्यानगरमधील 'समता नागरी पतसंस्थे'त खरात याच्याशी संबंधित खात्यांमधून ६३ कोटी रुपयांहून अधिक व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. खरात याने नातेवाईक आणि सहकाऱ्यांच्या नावावर बँक खाती उघडून त्यावर स्वतःचा मोबाईल क्रमांक नोंदवला होता, जेणेकरून या खात्यांवर त्याचे पूर्ण नियंत्रण राहील.

पुणे येथील सीए प्रकाश पोफळे आणि त्यांचा मुलगा हर्षद यांच्या निवासस्थानातून ४२ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी ‘ईडी’ने प्रकाश पोफळे, त्यांची मुले ललित आणि हर्षल, तसेच खरात याचा जवळचा सहकारी राहुल देशमुख यांना समन्स बजावले आहे. खरात याची पत्नी गेल्या १० दिवसांपासून बेपत्ता असून शोध सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तपासादरम्यान खरात याची मुलगी उपस्थित होती. जप्त केलेल्या दागिन्यांचे मूल्यमापन सध्या सुरू आहे.

भोंदू खरातच्या मालमत्तांची २ गोण्या कागदपत्रे जप्त

भोंदूबाबा अशोक खरात याच्याविरोधात गुन्ह्यांची मालिका सुरूच असून या बहुचर्चित प्रकरणात ‘ईडी’ च्या विशेष १३ सदस्यीय पथकाने खरातचे नाशिकमधील निवासस्थान, सिन्नर (मिरगाव) येथील कार्यालये आणि पुण्यातील त्याच्या सीएच्या (सनदी लेखापाल) ठिकाणांवर दोन दिवस छापे टाकले. या कारवाईत दोन गोण्या भरून महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली असून त्यात अनेक बड्या सरकारी अधिकाऱ्यांचे ‘कनेक्शन’ उघडकीस आले आहे. या अधिकाऱ्यांची ‘ईडी’ स्वतंत्र चौकशी करणार असून त्यांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत. ही कागदपत्रे खरातच्या आर्थिक साम्राज्याचा भांडाफोड करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

‘तृप्तबाला’ बंगल्याची तब्बल १५ तास झडती

खरातच्या नाशकातील कर्मयोगीनगरमधील ‘तृप्तबाला’ या बंगल्यात तब्बल १५ तासांच्या झडतीत जप्त केलेल्या दोन गोण्या कागदपत्रांची सध्या पथकाकडून कसून तपासणी सुरू आहे. प्राथमिक माहितीतून या कागदपत्रांमध्ये नाशिकसह पाथर्डी आणि गौळाणे शिवार परिसरातील मोक्याच्या भूखंडांच्या खरेदी-विक्रीचे आणि मालकीचे दस्तऐवज सापडले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे खरातशी संबंधित अनेक मालमत्ता आणि भूखंड हे काही बड्या शासकीय अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे असल्याचे समोर आले आहे. काळ्या पैशांची गुंतवणूक करण्यासाठी या अधिकाऱ्यांनी खरातच्या माध्यमातून नातेवाइकांच्या नावे जमिनी घेतल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. यात केवळ नाशिकच नव्हे, तर पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक मोक्याच्या जागांचाही समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे.

संबंधित अधिकाऱ्यांना लवकरच नोटिसा

जप्त केलेल्या कागदपत्रांमध्ये ज्या शासकीय अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे निष्पन्न झाली आहेत, त्यांची संपूर्ण माहिती ईडीने संकलित केली आहे. आता थेट या संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनाच ईडीकडून लवकरच स्वतंत्र नोटिसा बजावण्यात येणार आहेत. त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत आणि या जमिनींच्या खरेदीतील आर्थिक व्यवहार याबाबत ईडीकडून त्यांची सखोल चौकशी होणार असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. यामध्ये मुंबईत नियुक्त असलेल्या दोन अपर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ पोलिस अधिकारी, जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची शक्यता आहे.

‘ईडी’ने २.४ कोटींची बँक खाती गोठवली

‘ईडी’ने केलेल्या कारवाईत खरात याची २.४ कोटी रुपयांची बँक खाती गोठवण्यात आली असून एक मर्सिडीज बेंझ कार जप्त केली आहे. ही कार मृत्यूची भीती दाखवून आणि दैवी शाप देण्याची धमकी देऊन उकळल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. खरात याच्या निवासस्थानातून पुणे, नाशिक आणि सोलापूरमधील जमिनींशी संबंधित ७० ते ८० कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत. त्यामध्ये विक्री करारांचा समावेश असून काही कागदपत्रे खरात याच्या अनुयायांशी संबंधित असल्याची शक्यता आहे.

अंजली दमानियांकडून नवी नावे जाहीर

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भोंदूबाबा अशोक खरात यांच्या संपर्कात असलेल्या राजकारण्यांची तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांची नावे जाहीर केली आहेत. त्यांनी याआधीच संबंधित राजकारण्यांची नावे समोर आणणार असल्याचे संकेत दिले होते. दमानिया यांनी नाशिकचे आमदार नितीन पवार, चंद्रकांत पाटील, तसेच चंद्रकांत पाटलांचे पीए मंगेश देशपांडे, उदय सांगळे (सिन्नरमधून निवडणूक लढलेले), विधान परिषदेचे आमदार शिवाजी शहाणे, पद्मश्री पोपटराव पवार, रामदास खेडकर (दादा भुसे यांचे पीए), दीपक केसरकर, तसेच राहुल कोतडे (ओएसडी विखे पाटील), प्रभाकर काळे यांची नावेही जाहिर केली. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कॉल डिटेल्सही समोर आणल्याचा दावा त्यांनी केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in