'कॅप्टन' अशोक खरातने कशी केली महिलांची फसवणूक?

दैवी शक्तीचा दावा करून, संमोहन आणि अघोरी विधींच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या स्वयंघोषित संख्याशास्त्रज्ञ आणि भोंदूबाबा अशोक खरात ऊर्फ 'कॅप्टन' खरात याच्या काळ्या कारनाम्यांचा पर्दाफाश झाला आहे.
'कॅप्टन' अशोक खरातने कशी केली महिलांची फसवणूक?
Published on

नाशिक : दैवी शक्तीचा दावा करून, संमोहन आणि अघोरी विधींच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या स्वयंघोषित संख्याशास्त्रज्ञ आणि भोंदूबाबा अशोक खरात ऊर्फ 'कॅप्टन' खरात याच्या काळ्या कारनाम्यांचा पर्दाफाश झाला आहे. नाशिक गुन्हे शाखेने त्याला अटक केली असून, या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी राज्य सरकारने आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे.

या प्रकरणाची सुरुवात १२ मार्च रोजी शिर्डीत झाली. खरातचा कर्मचारी नीरज जाधव याने एका महिलेचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती. तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. खरातचा दुसरा कर्मचारी निलेश जाधव याने खरात आणि पीडित महिलेचे काही आक्षेपार्ह व्हिडीओ चोरून चित्रीत केले होते आणि त्याद्वारे तो खरातलाच ब्लॅकमेल करत होता. यानंतर एका ३५ वर्षीय विवाहित महिलेने नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन खरातविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली. नोव्हेंबर २०२२ ते डिसेंबर २०२५ या काळात खरातने वारंवार अत्याचार केल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.

शोषणाचे अघोरी मार्ग

अशोक खरात हा पूर्वी मर्चेंट नेव्हीमध्ये कार्यरत होता, त्यामुळे त्याला 'कॅप्टन' म्हटले जायचे. १५ भाषा अवगत असलेल्या खरातने संख्याशास्त्राच्या जोरावर लोकांचा विश्वास संपादन केला. तो महिलांना सांगायचा की, अपत्यप्राप्तीसाठी किंवा घरातील समस्या निवारण्यासाठी 'योनी पूजा' करणे अनिवार्य आहे. याच विधीच्या नावाखाली तो महिलांवर अत्याचार करायचा. काहींना तर त्याने पतीच्या जीवाला धोका असल्याचे सांगून घाबरवले आणि त्यांचे शोषण केले. अनेकदा तो महिलांशी बनावट लग्न लावून त्यांना आपल्या जाळ्यात ओढत असे.

२०० कोटींची माया?

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मागील १५ वर्षांत २०० कोटींची माया खरातने गोळा केली आहे. खरातने स्वतःच्या पत्नी आणि मुलीच्या नावेही कोट्यवधींच्या जमिनी घेतल्या आहेत. सध्या पोलीस त्याच्या आर्थिक व्यवहारांची आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या इतर बड्या व्यक्तींची चौकशी करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in