आश्रमशाळा अत्याचार प्रकरण; आरोपींना एकाच गुन्ह्यात चार वेळा जन्मठेप, 'या' जिल्ह्यात पहिल्यांदाच अशी शिक्षा

दोघा आरोपींना जिल्हा न्यायाधीश अनिरूद्ध गांधी यांनी एकाच गुन्ह्यात चार वेळा जन्मठेपीची शिक्षा सुनावली असून, अशाप्रकारची ही जिल्ह्यातील पहिलीच शिक्षा ठरली आहे
आश्रमशाळा अत्याचार प्रकरण; आरोपींना एकाच गुन्ह्यात चार वेळा जन्मठेप, 'या' जिल्ह्यात पहिल्यांदाच अशी शिक्षा

सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील आश्रमशाळा चालक अरविंद पवार (66 रा. मांगले, ता.शिराळा) याने आश्रमशाळेतील मुलींवर लैंगिक अत्याचार आणि विनयभंग केला होता. पवार याच्यासह आश्रमशाळेत काम करणारी स्वयंपाकीण मनिषा कांबळे (46, रा.चिकुर्डे, ता.वाळवा) या दोघा आरोपींना जिल्हा न्यायाधीश अनिरूद्ध गांधी यांनी एकाच गुन्ह्यात चार वेळा जन्मठेपीची शिक्षा सुनावली असून, अशाप्रकारची ही जिल्ह्यातील पहिलीच शिक्षा ठरली आहे. न्यायालयाने पिडीत ४ मुलींना दंडातील ५० हजार रक्कम देण्याचेही आदेश दिले.

काय आहे प्रकरण?

अरविंद पवार हा 1996 पासून आश्रमशाळा चालवत होता. आश्रमशाळेत निवासी वसतिगृहात शिकणाऱ्या मुलींना धमकावून व भीती दाखवून स्वयंपाकीण मनिषा कांबळे हिच्या सहाय्याने लैंगिक अत्याचार करत होता. पिडीत मुलींनी 25 सप्टेंबर 2018 रोजी आश्रमशाळेत अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार होत असल्याचे निनावी पत्र कुरळप पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक पल्लवी चव्हाण यांना पाठवले होते. अरविंद पवार आणि तेथे कामाला असणारी मनिषा कांबळे हे मुलींवर अत्याचार करत असून त्यांच्यावर तुम्ही कारवाई करावी, असे पत्रात लिहिले होते.

निनावी पत्रानंतर उघडकीस आला धक्कादायक प्रकार-

निनावी पत्र मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरिक्षक विवेक पाटील यांनी तत्काळ साध्या वेशात पल्लवी चव्हाण यांना शाळेत पाठवून पडताळणीसाठी पाठवले. पल्लवी चव्हाण यांनी त्यांनी शाळेत जाऊन मुलींशी संवाद साधला. त्यांना विश्‍वासात घेतल्यानंतर मुलींनी पवार याच्या कृत्याचा पाढाच वाचला. यानंतर पोलिसांनी 27 सप्टेंबर 2018 रोजी या दोघांवर गुन्हा दाखल केला होता. या दोघांविरुद्ध सुमारे 350 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. पवार आणि कांबळे यांच्यावर भादंविस कलम 376 व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा कलम 4,6,10 प्रमाणे दोषारोप ठेवले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in