

मुंबई/पुणे : प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात राज्यपाल, न्यायव्यवस्था आणि विधानसभा अध्यक्ष यांच्यावर केलेल्या टिकात्मक विधानाप्रकरणी सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द करण्याच्या बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्या निर्णयाला बार कौन्सिल ऑफ इंडियाने स्थगिती दिली आहे.
असिम सरोदे यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात राज्यपाल, न्यायव्यवस्था आणि विधानसभा अध्यक्ष यांच्यावर टिकात्मक विधाने केली होती. त्यामुळे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी त्यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. या आदेशाविरोधात अॅड. सरोदे यांनी बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे दाद मागितली होती. त्यानुसार असिम सरोदे यांची सनद रद्द करण्याच्या आदेशाला बार कौन्सिल ऑफ इंडियाने स्थगिती दिली आहे.
असिम सरोदे हे सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेल्या सुनावणीत सहभागी असलेल्या वकीलांपैकी एक आहेत. त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात राज्यपाल, न्यायव्यवस्था आणि विधानसभा अध्यक्ष यांच्याविरोधात वक्तव्य केल्यावर एका तक्रारदारने बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाकडे त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार बार कौन्सिलने अॅड. सरोदे यांचे वक्तव्य हे बेजाबाबदार, अशोभनीय आणि बदनामीकारक असल्याचे सांगत त्यांची सनद तीन महिने रद्द आणि २५ हजार रुपये दंड करण्याचा निर्णय घेतला होता. सनद रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती मिळाल्यावर ॲड. सरोदे म्हणाले की, “सत्याचा विजय होण्याची सुरुवात कधीतरी होत असते. बार कौन्सिल ऑफ इंडियाचे मी आभार मानतो.”