छत्रपती संभाजीनगरमध्ये घातपाताचा कट: एनआयएची हर्सूलमध्ये कारवाई; इसिसच्या संपर्कात असल्याचा संशय
छत्रपती संभाजीनगर : इसिस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात राहून शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी मोठी घातपाताची कारवाई करण्याचा कट रचणाऱ्या संशयित दहशतवाद्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स, गुन्ह्यासंबंधी कागदपत्रे जप्त केली. छत्रपती संभाजीनगरातील हसूलमधील बेरीबाग परिसरात गुरुवारी (दि. १५) ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे शहरातील इसिस कनेक्शन पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आले आहे.
मोहंमद झोएब खान (४०, रा. बेरीबाग, हसूल) असे एनआयएने अटक केलेल्या संशयित दहशतवाद्याचे नाव आहे. तो वेब डिझाईनर असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. अधिक माहितीनुसार, एनआयएने नऊ ठिकाणी छापेमारी केली. त्यानंतर झोएबला अटक केली. झोएब काही महिन्यांपासून ऑनलाइन पद्धतीने इसिसच्या संपर्कात होता. ही बाब एनआयएच्याही लक्षात आली होती. तेव्हापासून एनआयएचे झोएबवर बारीक लक्ष होते. याची एकाही स्थानिक यंत्रणेला माहिती नव्हती. दहशतवाद विरोधी पथकालाही ही खबर. नव्हती मागील काही दिवसांपासून अधिक सक्रिय झाला होता.
त्याने स्थानिकला नेटवर्क तयार करण्याचेही काम हाती घेतले होते. तसेच तो भारतात मोठा घातपात करण्याच्या तयारीला लागला होता. त्यापूर्वीच एनआयएने त्याच्या घरात छापा मारला. या तपासणीत काही महत्त्वाची कागदपत्रे व लॅपटॉप व इतर साहित्यही पथकाने जप्त केले आहे. या प्रकरणात एनआयएने मुंबईत गुन्हा दाखल केला आहे, असे एनआयएने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.