
अहमदनगर : लेखक हेरंब कुलकर्णी यांच्यावर तीन अज्ञात व्यक्तींनी शनिवारी प्राणघातक हल्ला केला. यात कुलकर्णी यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली आहे. याबाबतची तक्रार हेरंब कुलकर्णी यांनी अहमदनगर पोलिस ठाण्यात नोंदवली आहे.
हेरंब कुलकर्णी यांनी अहमदनगर पोलिसांमध्ये नोंदवलेल्या तक्रारीनुसार, कुलकर्णी आणि त्यांचे सहकारी गाडीवरून जात असतानाच तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांचा पाठलाग केला. त्यांनी हेरंब कुलकर्णी यांची गाडी थांबवली. त्यानंतर दोन व्यक्ती आमच्याजवळ आल्या आणि त्यांनी काहीच न बोलता मारहाण करण्यास सुरूवात केल्याचा आरोप हेरंब कुलकर्णी यांनी केला आहे.
मराठी साहित्य विश्वातील व्यक्तींवर हल्ले होण्याची ही पहिली वेळ नाही. या आधी देखील अनेकदा साहित्य क्षेत्रातील व्यक्तींवर हल्ले झाले आहेत. हेरंब कुलकर्णी यांच्यावर नेमका हल्ला कोणत्या कारणामुळे झाला, याचा अद्याप तपास सुरू आहे.
या संदर्भात हेरंब कुलकर्णी यांच्या पत्नीने फेसबूकवर पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘माझे पती हेरंब कुलकर्णी शनिवारी दुपारी १२.१८ मिनिटांनी शाळेतून परत जाताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. आजारी असल्याने ते सहकारी शिक्षक सुनील कुलकर्णी यांच्या गाडीवरून येताना अहमदनगर येथे रासने नगर जवळ तीन तरुणांनी गाडी अडवून लोखंडी रॉडने मारहाण केली. डोक्याला ४ टाके पडले आहेत. त्यानंतर त्यांनी तोफखाना पोलीस चौकीत गुन्हा दाखल केला आहे. पण ४८ तासांत पोलिसांनी कोणालाही अटक केली नाही की सीसीटीव्ही फुटेजही तपासले नाही. सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तीला रस्त्यात अडवून रॉडने जीवघेणा हल्ला करणे हे खूप उद्विग्न करणारे आहे.’
हल्लेखोरांना तत्काळ अटक करा, मुख्यमंत्र्यांचे अहमदनगर पोलीस अधीक्षकांना निर्देश
प्रतिनिधी/मुंबई : शिक्षण क्षेत्राबाबत विपुल लेखन केलेले ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत हेरंब कुलकर्णी यांच्यावर अहमदनगर येथे झालेल्या हल्ल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. कुलकर्णी यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना तत्काळ अटक करण्याचे निर्देश शिंदे यांनी अहमदनगर पोलीस अधीक्षकांना दिले.
हेरंब कुलकर्णी यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळताच एकनाथ शिंदे यांनी त्यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच त्यांना लागेल ती मदत करण्याची तयारी दर्शवली. यावेळी कुलकर्णी यांनी मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून तब्येतीबद्दल विचारणा केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. गेल्या काही दिवसांपासून शाळेपासून १०० मीटरच्या अंतरावर गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होऊ नये, यासाठी आपण आंदोलन करत असल्याचे त्यांनी सांगितले. याच गोष्टीचा आकस मनात बाळगून आपल्यावर हल्ला करण्यात आला असावा, अशी शक्यता त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. त्यावर एकनाथ शिंदे यांनी आपल्यावर हल्ला करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांना आशवस्त केले. तसेच हेरंब कुलकर्णी यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी देखील संवाद साधून शिंदे प्रकृतीची माहिती घेणार आहेत.