मुंबई : राज्यातील विधानसभेच्या निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली लढविल्या जातील, अशी ग्वाही देतानाच महायुतीचे जागावाटप योग्य दिशने सुरू असल्याचा दावा शिवसेनेचे प्रवक्ते (शिंदे गट) आणि माजी आमदार कृष्णा हेडगे यांनी केला.
हेडगे यांनी सोमवारी ‘फ्री प्रेस जर्नल’ कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी राज्यातील राजकारणावर आपली मते मांडली.
विधानसभेसाठी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) मध्ये जागांचे वाटप समाधानकारक होत असून तसेच रिपब्लिकन पार्टी (आठवले) सह सहयोगी पक्षांना सन्मानाने सामावून घेतले जाईल, असेही हेडगे म्हणाले. मागील लोकसभा निवडणुकीतील चुकीची पुनरावृत्ती आगामी विधानसभा निवडणुकीत केली जाणार नाही. यंदा स्थानिक मुद्द्यांच्या आधारावर निवडणूक लढविण्यात येतील. बदलापूरसारख्या घटना दुर्दैवी असून अशा घटनांचे विरोधकांकडून राजकारण केले जात असल्याचेही हेडगे यांनी सांगितले. शिव पुतळाप्रकरणी सार्वजनिक बांधकाम खात्याला दोष आढळल्यानंतर त्यांनी नौदलाला पत्र लिहिण्याऐवजी स्वतःच दुरुस्ती करायला हवी होती, असेही त्यांनी म्हटले. या प्रकरणात केवळ नौदलावर दोष ढकलणे योग्य होणार नाही, असेही ते म्हणाले. दुर्घटनेच्या निषेधार्थ विरोधकांनी केलेले आंदोलन म्हणजे महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण भारताच्या राजकारणासाठी काळा दिवस ठरला, अशी टीकाही त्यांनी केली.