महाबळेश्वर पालिकेत व्यापाऱ्यांचा ‘ठिय्या’, ठेकेदार सुस्त, पालिका प्रशासन कारवाई करणार का?

जिल्हाधिकारी डुडी यांनी चालू एप्रिल अखेर संपूर्ण बाजारपेठेचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेकेदारास दिले होते व त्यानंतर गेल्या जानेवारी महिन्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ते पोलीस ठाणे या एका बाजूच्या कामास सुरुवात झाली होती. मात्र तब्बल तीन महिन्यांचा काळ लोटून गेला तरी अद्यापही ठेकेदाराच्या निष्क्रियतेमुळे बाजारपेठेचे २०% देखील काम मुदतीमध्ये ठेकेदाराला पूर्ण करता आले नसल्याचे चित्र आहे.
महाबळेश्वर पालिकेत व्यापाऱ्यांचा ‘ठिय्या’, ठेकेदार सुस्त, पालिका प्रशासन कारवाई करणार का?
Published on

कराड : महाबळेश्वर शहरात गेल्या दोन वर्षांपासून सुशोभीकरण कामे सुरू असून ही कामे ठेकेदाराच्या अनास्थेमुळे अद्यापही अपूर्णावस्थेत असतानाच ती तातडीने पूर्ण करण्यासाठी साधारण तीन महिन्यांपूर्वी मुख्य बाजारपेठेत रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली होती. मात्र मे महिन्याचा प्रमुख हंगाम तोंडावर असताना देखील ही कामे सुस्त ठेकेदाराच्या निष्क्रियतेमुळे अद्यापही अपूर्णावस्थेत असल्याने व्यापारी आक्रमक झाले आहेत. महाबळेश्वर पालिका कार्यालयातच व्यापाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत 'ठेकेदार सवानी हटाव महाबळेश्वर बचाव'च्या घोषणा दिल्या. व्यापाऱ्यांनी पालिका प्रशासक योगेश पाटील यांना येत्या दहा दिवसांमध्ये हे काम पूर्ण करण्याबाबतची मुदत देत निवेदन दिले आहे तर पालिका प्रशासक योगेश पाटील यांनी आपल्या व्यथा जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे आश्वासन दिले आहे.

महाबळेश्वरसारख्या देशविदेशातील पर्यटकांच्या पसंतीच्या पर्यटनस्थळांवर सुशोभीकरणाच्या नावाखाली बकालीकरण सुरू असल्याचा आरोप शहरवासीयांकडून होत असून गेल्या दोन वर्ष शहरात या सुशोभीकरण अंतर्गत सुरू असलेली कामे अद्यापही कासवगतीने सुरूच असून जिल्हा प्रशासनाने नव्याने तयार केलेल्या आराखड्यानुसार बाजारपेठेचे काम जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ठेकेदार राम सावनी व वास्तुविशारद पंकज जोशी यांना व्यापाऱ्यांना विश्वासात घेत दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या.

जिल्हाधिकारी डुडी यांनी चालू एप्रिल अखेर संपूर्ण बाजारपेठेचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेकेदारास दिले होते व त्यानंतर गेल्या जानेवारी महिन्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ते पोलीस ठाणे या एका बाजूच्या कामास सुरुवात झाली होती. मात्र तब्बल तीन महिन्यांचा काळ लोटून गेला तरी अद्यापही ठेकेदाराच्या निष्क्रियतेमुळे बाजारपेठेचे २०% देखील काम मुदतीमध्ये ठेकेदाराला पूर्ण करता आले नसल्याचे चित्र आहे. या महत्त्वपूर्ण कामाकडे ठेकेदाराचे होत असलेले दुर्लक्ष व अपुरे मनुष्यबळ या अन अशा अनेक तक्रारी नागरिकांमधून होत असल्यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सातारा नगरपालिका प्रशासक अभिजित बापट याना या कामांचा आढावा घेण्यासाठी येथे पाठविले होते. त्यांनी देखील ही कामे पाहून नाराजी व्यक्त केली होती. या कामाचा अहवाल देखील जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडे दिला आहे. पालिकेच्यावतीने प्रशासक योगेश पाटील यांनी देखील अनेक नोटिसा संबंधित ठेकेदारास देऊन देखील सुस्त ठेकेदार ही कामे पूर्ण करण्यात अपयशी ठरत आहे. शहरातील मुख्य बाजरपेठेतील रस्त्यावर दगडे लावण्याचे काम अद्यापही अपूर्णावस्थेत असून गत पंधरा दिवसांपासून दगड, वाळू रस्त्यावर तशीच पडून आहेत. वारंवार खोद काम व केवळ दोन तीन कामगारांवर ही कामे करत असतानाचे चित्र असून या कामाचा दर्जा, अपुरे मनुष्यबळांमुळे हे कामे येत्या उन्हाळी हंगामापर्यंत पूर्ण होणार का? याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

यावेळी व्यापारी विशाल तोषनीवाल, हेमंत साळवी, सचिन वागदरे, डी.एम बावळेकर,रमेश पल्लोड,ज्योती बोधले, वृषाली डोईफोडे,अतुल सलागरे,अ‍ॅड संजय जंगम,राजेंद्र पंडित,केतन यादव,प्रेषित गांधी,अभिजित खुरासणे, सनीशेट अरोरा,मनीष मुक्कावार,आकाश साळुंके,सागर सोनावणे,धनंजय भिसे,नितीन काळे,बंटी शेटे,मंगेश शिपटे,महेश ताथवडेकर,राहुल तांबे,राजेंद्र धोत्रे आदींसह मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते.

आंदोलनाचा इशारा

“ठेकेदार सवानी हटाव महाबळेश्वर बचाव”च्या घोषणा देत अशा ठेकेदारास काळ्या यादीमध्ये टाकण्याची मागणी पालिका प्रशासक योगेश पाटील यांच्याकडे केली. तसेच ठेकेदाराच्या निष्क्रियतेचा पाढाच वाचला दगड लावण्याचे काम तातडीने पूर्ण करा अन्यथा आम्हाला रस्त्यावर डांबरीकरण करून द्या. पर्यटकांचे हाल होत असून रोज पर्यटक या अपूर्ण कामांमुळे अपघातात जखमी होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले व ही कामे येत्या दहा दिवसांत पूर्ण न झाल्यास रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in