

आशिष सिंग/मुंबई
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या एका कट्टरपंथी संघटनेचा हैदराबादस्थित ‘दरसगाह-जिहाद-ओ-शहादत’ (डीजेएस) शी संबंधित व्यक्तींशी असलेला आंतरराज्यीय नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. अल्पवयीन मुलांमध्ये कट्टरपंथी विचारसरणी रुजवून त्यांची एक गुप्त ‘बाल’ शाखा तयार करण्याच्या प्रयत्नाचा तपास अधिकारी करत आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान महाराष्ट्रातील संशयित आणि हैदराबादच्या डीजेएसशी संबंधित व्यक्तींमधील कार्यात्मक, आर्थिक आणि लॉजिस्टिक संबंध निष्पन्न झाले आहेत. या तपासाचे धागेधोरे अहिल्यानगर आणि यवतमाळ परिसरातील पुसद, पारडी आणि उमरखेड येथील संशयितांपर्यंत पोहोचले आहेत. अधिकारी सध्या संवाद नोंदी, आर्थिक व्यवहार, प्रवासाचा तपशील आणि इतर पुराव्यांची तपासणी करत आहेत.
मुलांसाठी प्रशिक्षण शिबिरे आणि वैचारिक सत्रे घेऊन त्यांना कट्टरपंथी बनवण्याचा, तसेच एक विशेष बाल शाखा स्थापन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या संघटनेवर ‘एटीएस’ने नुकतीच कारवाई केली होती. या घडामोडींचे वृत्त सर्वात आधी ११ ऑगस्ट रोजी ‘द फ्री प्रेस जर्नल’ने दिले होते.
एटीएस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील काही संशयितांनी डीजेएसशी संबंधित व्यक्तींशी गुप्त संपर्क ठेवला होता आणि या संस्थेच्या सामाजिक उपक्रमांच्या नावाखाली आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता. हे संपर्क वैयक्तिक पातळीवरील होते की एका मोठ्या आंतरराज्यीय नेटवर्कचा भाग होते, याचा तपास सध्या सुरू आहे.
सुरक्षा दस्तऐवजांवरून असे दिसून आले आहे की, डीजेएसकडून सुरुवातीचे प्रशिक्षण घेतलेले कार्यकर्ते नंतर इंडियन मुजाहिद्दीन, लश्कर-ए-तोयबा, हरकत-उल-जिहाद अल-इस्लामी आणि अल-कायदाशी संबंधित बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांकडे आकर्षित झाले.
तरुणांना कट्टर बनवण्याचा कट
दोन दशकांनंतर, डीजेएस आणि ‘सिमी’च्या छुप्या संघटनांशी संबंधित घटक पुन्हा एकदा तरुण मनांवर प्रभाव पाडून त्यांना कट्टरपंथी विचारसरणीकडे ओढण्याचा प्रयत्न करत असावेत, असा संशय अधिकाऱ्यांना आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. एटीएसने याची पाळेमुळे खाेदून काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मोठा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.