वागळेंवरील हल्ला पूर्वनियोजित; हे सरकार दाभोलकर, पानसरे यांच्या घटनांची पुनरावृत्ती होण्याची वाट बघतंय : जयंत पाटील

"वागळे हे स्वतंत्र विचारांचे पुरोगामी पत्रकार असून त्यांनी अनेकदा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अगदी वंचित आघाडीच्या नेत्यांवरही प्रखर शब्दांत टीका केली आहे, मात्र त्यामुळे...
वागळेंवरील हल्ला पूर्वनियोजित; हे सरकार दाभोलकर, पानसरे यांच्या घटनांची पुनरावृत्ती होण्याची वाट बघतंय : जयंत पाटील
(संग्रहित छायाचित्र)

पुण्यात ‘निर्भय बनो’ कार्यक्रमासाठी आलेल्या ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर शुक्रवारी संध्याकाळी उशीरा भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. त्यांची गाडी फोडण्यात आली, तसेच शाईफेक आणि अंडी देखील फेकण्यात आली. या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. "हा हल्ला पूर्वनियोजित होता. हे सरकार दाभोलकर, पानसरे यांच्याबाबत घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती होण्याची वाट बघत आहे", असे जयंत पाटील म्हणाले.

"वागळे हे स्वतंत्र विचारांचे पुरोगामी पत्रकार असून त्यांनी अनेकदा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अगदी वंचित आघाडीच्या नेत्यांवरही प्रखर शब्दांत टीका केली आहे, मात्र त्यामुळे त्यांच्यावर हल्ला करण्याचा विचारही आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मनाला शिवला नाही. मात्र सरकारच्या विरोधात काहीही बोलले की समोरच्या व्यक्तीवर हल्ला करुन तो विचार संपवण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असतो", अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

पोलिसांना मदत मागूनही पोलिसांनी कोणतीही मदत केली नाही. गाडीवर दगड, शाई व अंडी फेकण्यात आली असून हा हल्ला पूर्वनियोजित होता, असा आरोप करतानाच हे सरकार दाभोलकर, पानसरे यांच्याबाबत घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती होण्याची वाट बघत आहे, असे पाटील म्हणाले.

दोषींवर कडक कारवाई-पवार

दरम्यान, मी पुण्याच्या पोलीस आयुक्तांशी लगेच बोलणार असून कडक कारवाई करायला सांगणार आहे. जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in