विरोधी पक्षनेत्यांचा माइक बंद करण्याचा प्रयत्न; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आरोप

प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांनी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केली.
अंबादास दानवे
अंबादास दानवेसंग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांनी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केली. याप्रकरणी विधानपरिषद सभागृहात आवाज उठवत असताना विरोधी पक्ष नेत्यांचा माईक सत्ताधाऱ्यांकडून बंद करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत केला.

राज्य सरकार विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. अबू आझमी यांनी क्रूर बादशहा औरंगजेब याचे उदात्तीकरण होईल, असे वक्तव्य केले. प्रशांत कोरटकर यांनी इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना धमकी दिली आहे. राहुल सोलापूरकर यांनीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांचा विकृतपणे इतिहास मांडला असल्याने या तिघांवर एकत्र कारवाई करण्यात यावी, अशी मागणी दानवे यांनी केली आहे.

अबू आझमी यांचे विधानसभा सभागृहाचे सदस्यत्व रद्द करण्यात आले पाहिजे, अशा प्रकारे त्यांनी शिवाजी महाराजांच्या बाबत वक्तव्य केले आहे. सत्ताधारी पक्षातील आमदारांनी अबू आझमी यांच्या विरोधात भूमिका घेतली असली तरीही त्याचीच पिलावळ प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्याविरोधात काहीही भूमिका घेतली नसल्याची जोरदार टीका अंबादास दानवे यांनी केली.

राहुल सोलापूरकर याने आमची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास विकृत पद्धतीने मांडला आहे. विकृत मानसिकता असलेल्या या गुन्हेगारांवर कारवाई करण्याच्या ऐवजी पुणे महानगरपालिकेच्या वतीने सांस्कृतिक धोरण ठरवणाऱ्या सल्लागार समितीत घेऊन सन्मान करण्यात आला आहे. हे प्रकरण लक्षात घेता शासनच राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांना पाठीशी घालत असल्याचे दिसून येत असल्याचे दानवे म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in