गुणवंत विद्यार्थ्यांचा पॉलिटेक्निककडे ओढा,१०० टक्के गुण मिळालेल्या १४ विद्यार्थ्यांचे अर्ज: ९१ ते ९९ टक्के मिळालेल्या १० हजार २९६ विद्यार्थ्यांचे अर्ज

पॉलिटेक्निक प्रवेशासाठी दहावी परीक्षेत १०० टक्के गुण मिळालेल्या १४ विद्यार्थ्यांनी तर ९१ ते ९९ टक्के गुण मिळालेल्या १० हजार २९६ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत.
गुणवंत विद्यार्थ्यांचा पॉलिटेक्निककडे ओढा,१०० टक्के गुण मिळालेल्या १४ विद्यार्थ्यांचे अर्ज: ९१ ते ९९ टक्के मिळालेल्या १० हजार २९६ विद्यार्थ्यांचे अर्ज
Published on

प्रतिनिधी/मुंबई

दहावीनंतरच्या प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या (पॉलिटेक्निक) प्रवेशप्रक्रियेसाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने आज तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली. त्यानुसार गुणवंत विद्यार्थ्यांचा पॉलिटेक्निककडे ओढा असल्याचे स्पष्ट झाले आहे. पॉलिटेक्निक प्रवेशासाठी दहावी परीक्षेत १०० टक्के गुण मिळालेल्या १४ विद्यार्थ्यांनी तर ९१ ते ९९ टक्के गुण मिळालेल्या १० हजार २९६ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत.

पॉलिटेक्निकच्या प्रवेशासाठी १ लाख ५५ हजार ३०२ विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख २७ हजार ९७२ विद्यार्थ्याचे अर्ज सुविधा केंद्रांद्वारे निश्चित केले आहेत. त्यानुसार तंत्रशिक्षण संचालनालयाने पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. विद्यार्थी त्यांच्याशी संबंधित गुणवत्ता यादीची माहिती त्यांच्या लॉगीनमध्ये पाहू शकतात. गुणवत्ता यादीमध्ये ८४ हजार ४६३ मुले व ४३ हजार ५०९ मुली आहेत.

प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक पात्रता, आरक्षण इत्यादींबाबत दुरुस्ती करावयाची असल्यास २१ जुलै ते २३ जुलै या कालावधीमध्ये सुविधा केंद्राद्वारे कागदपत्रे पडताळणी नंतर सदर बदल करु शकतात. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी संचालनालयाकडून २५ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पहिल्या केंद्रिभूत प्रवेश फेरीसाठी पसंतीक्रम (विकल्प अर्ज) २६ जुलै ते २९ जुलै या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईनपणे भरता येणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार झालेले पहिल्या फेरीचे जागावाटप संचालनालयाकडून ३१ जुलै रोजी प्रसिद्ध केले जाणार आहे. यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी केंद्रिभूत प्रवेश फेरीसाठी विकल्प अर्ज भरण्याचे आवाहन संचालनालयातर्फे करण्यात येत आहे.

राज्यातील पदविका प्रवेशासाठी शासनामार्फत एकच प्रवेशप्रक्रिया राबविली जाते. ही प्रक्रिया ऑनलाईन प्रकारची असून यामुळे विद्यार्थांना प्रत्येक पॉलिटेक्निकसाठी वेगळा फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेशाच्या तीन फेऱ्या घेण्यात येणार आहेत. तंत्रशिक्षण संचालनालयाने सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in