छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत असलेले सुनील केंद्रेकरांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. धडाकेबाज IAS अधिकारी अशी केंद्रेकर यांची ओळख आहे. त्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दाखल केला आहे. यामुळे चर्चांना उधान आलं आहे. औरंगाबाद खंडपिठाने मात्र सुनील केंद्रेकर यांचा अर्ज न स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत.
सुनील केंद्रेकर यांनी शासनाकडे मागच्या महिन्यात व्हीआरएससाठी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या या निर्णयावर औरंगाबाद खंडपिठाने मोठा निर्णय दिला असून केंद्रेकरांनी दिलेल्या स्वेच्छानिवृत्तीसाठी दिलेला अर्ज सरकारने स्वीकारु नये, असा आदेश दिला आहे. मार्च २०२४ पर्यंत केंद्रेकर यांचा स्वेच्छानिवृत्ती अर्ज स्वीकारु नये असं न्यायालयाने म्हटलं आहे. न्यायालयाने छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीपूरवठा योजनेसाठी जी समिती नेमली आहे. त्यावर सुनील केंद्रेकर यांती अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. २०२४ च्या मार्च महिन्यात ही योजना अंतिम टप्प्यात आलेली असेल, तोपर्यंत केंद्रेकरांचा अर्ज न स्वीकारण्याचा आदेश कोर्टाने सरकारला दिला आहे.
सुनील केंद्रेकर यांनी अचानक असा निर्णय का घेतला याबाबत तर्त वितर्क लढवले जात आहेत. केंद्रेकर यांच्या सेवेचे अजून दोन ते अडीच वर्षे बाकी असताना त्यांनी हा निर्णय घेतला आहे. केंद्रेकर हे शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांनी शेतकऱ्यांसाठी विविध उपाययोजना राबवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. अशा धडाकेबाज अधिकाऱ्याने अचानक दिलेल्या स्वेच्छानिवृतीच्या अर्ज दिल्याने सगळ्यांच्या भूवया उंचावल्या आहेत.