Aditya Thackeray : मोठी बातमी! आदित्य ठाकरेंच्या गाडीवर हल्ला झालाच नाही; काय म्हणाले पोलीस अधिकारी?

काल आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) गाडीवर दगडफेक केल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाने केला होता, मात्र आता पोलिसांच्या दाव्याने प्रकरणाला वेगळे वळण लागले
Aditya Thackeray : मोठी बातमी! आदित्य ठाकरेंच्या गाडीवर हल्ला झालाच नाही; काय म्हणाले पोलीस अधिकारी?

काल शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) शिवसंवाद यात्रेनिमित्त औरंगाबादमध्ये (Aurangabad) असताना त्यांच्या गाडीच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आल्याचा दावा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला होता. मात्र, अशी कुठलाही प्रकार घडला नसल्याचा दावा औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी केला आहे. औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस उपअधीक्षक सुनिल लांजेवार म्हणाले की, "शिवसेना ठाकरे गटाने लावलेले आरोप खोटे असून सभेत किंवा आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर एकही दगड फेकण्यात आल्याची कोणतेही घटना घडलेली नाही."

पोलीस उपअधीक्षक सुनिल लांजेवार म्हणाले की, "आदित्य ठाकरेंची सभा महालगाव येथे झाली. दरम्यान सभा संपल्यावर त्यांचा ताफा निघाला असताना काही प्रमाणात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यामध्ये एक प्रसारमाध्यम प्रतिनिधी किरकोळ जखमी झाला आहे. परंतु यावेळी दगडफेक करण्यात आली असल्याचा दावा करण्यात आला आहे. असे काहीही झालेले नाही." असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. यावरून आता भाजपकडूनही टीका करण्यात आली आहे.

आदित्य ठाकरेंच्या सभेत उडाला गोंधळ; नेमकं काय घडलं?

काल शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रेनिमित्त औरंगाबादमध्ये होते. यावेळी त्यांची संध्याकाळी वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे सभा ठेवण्यात आली होती. तसेच, त्याच्याच दुसऱ्या बाजूला रमाबाई आंबेडकर यांच्या जंयतीचा कार्यक्रम सुरू होता. आदित्य ठाकरे यांच्या सभेला अडथळा होत असल्याचे पाहत त्यांच्या कार्यकर्त्यांनी डीजेचा आवाज बंद करण्यास सांगितला. मात्र, यावेळी समोरून डीजेचा आवाज आणखी वाढवला आणि एकच गोंधळ पाहायला मिळाला. हा वाद सुरु असताना आदित्य ठाकरेंनी स्टेजवरून खाली उतरून कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

"एकमेकांना समजून घ्यावे लागते. काही कारणास्तव डीजे बंद झाला असेल, मी त्यांची माफी मागितली. शिवशक्ती भीमशक्ती ही आता एकच आहे, आम्ही संविधानासाठी लढत आहोत. काही अडचण झाली असेल तर मी पुन्हा एकदा माफी मागतो. डीजे बंद झाला असेल ५-१० मिनीटांसाठी, मी माईकवरूनही डीजे चालू द्या, म्हणून सांगितले होते," असे आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in