छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नामकरण आता छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आले आहे. शासनातर्फे यासंदर्भात अधिसूचना (राजपत्र) काढण्यात आली. खा. डॉ. भागवत कराड यांनी यासाठी रेल्वेमंत्र्यांशी पत्रव्यवहार केला होता. शिंदे-फडणवीस सरकारने जिल्ह्याचे नाव बदलल्यानंतर आता रेल्वे स्थानकाचेही नाव बदलले.
२०२२ मध्ये शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर औरंगाबादचे नाव बदलून 'छत्रपती संभाजीनगर' करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर १५ सप्टेंबर २०२३ मध्ये जिल्हा आणि विभागाचे नामकरणही याच नावाने करण्यात आले. आता, जवळपास दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रेल्वे स्थानकालाही नवीन ओळख प्राप्त झाली आहे. आता रेल्वे स्थानकावर 'छत्रपती संभाजीनगर'चा फलक झळकू लागल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शहर, जिल्हा आणि विभागानंतर रेल्वे स्थानकाचे नामकरण झाल्याने शहराच्या नव्या ओळखीला अधिकृत शिक्का मिळाला आहे.