
"मी कोणत्याही सिनेमाला दोष देत नाहीये, खरं म्हणजे छावा चित्रपटाने छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्यासमोर आणला. पण, त्यानंतर राज्यामध्ये लोकांच्या भावना प्रज्वलित झालेल्या आहेत. औरंगजेबाबद्दलचा रागही खूप मोठ्या प्रमाणात बाहेर येतोय", असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेबाबत विधानसभेत निवेदन देताना म्हटले. नागपूरमधील हिंसाचाराच्या घटनेमध्ये सुनियोजित पॅटर्न असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना काहीही झालं तरी सोडणार नाही
नागपूरमधील हिंसाचाराच्या घटनेत एकूण ३३ पोलिस जखमी झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. जखमींमध्ये तीन उपायुक्त दर्जाचे पोलिस अधिकारी असून एका अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आल्याचं फडणवीसांनी सांगितलं. तसेच, पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला असेल त्यांना काहीही झालं तरी सोडणार नाही, पोलिसांवरचा हल्ला सहन केला जाणार नाही. पोलिस शांतता प्रस्थापित करीत होते. अशावेळी पोलिसांवर केलेला हल्ला अतिशय चुकीचा आहे, पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी निक्षून सांगितले.
नागपूरमधील हिंसाचाराच्या घटनेमध्ये सुनियोजित पॅटर्न
सकाळची घटना घडल्यानंतर शांतता होती. पण त्यानंतर काही लोकांनी जाणिवपूर्वक हल्ला केल्याचं लक्षात येतंय. घटनास्थळी एक ट्रॉली भरुन दगड मिळालेत. शस्त्रही मोठ्या प्रमाणात जप्त केलेत. ठरवून काही घरांना आणि आस्थापनांना लक्ष्य करण्यात आलं आहे. काही लोकांचा सुनियोजित पॅटर्न दिसतोय, अशा लोकांवर कारवाई केलीच जाईल, असे फडणवीस म्हणाले.
जात, धर्म न पाहता कारवाई करणार
महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था राखणं आपली सर्वांची जबाबदारी आहे. सर्व समाजांचे धार्मिक सण हे या कालावधीत सुरू आहेत. अशा परिस्थितीत सर्वांनी संयम ठेवावा, कुणीही संयम सोडू नये. कायदा आणि सुव्यवस्था कशी राखता येईल, एकमेकांप्रति आदरभाव कसा राखता येईल असा प्रयत्न सर्वांनी करावा, नागपुरातल्या जनतेसह महाराष्ट्रातल्या जनतेलाही ही विनंती करतो, असे फडणवीस म्हणाले. कोणीही दंगा करण्याचा प्रयत्न केला तर जात, धर्म न पाहता कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
११ पोलिस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी
नागपूरमध्ये ११ पोलिस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली असून एसआरपीएफच्या पाच तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तहसील, कोतवाली, गणेशपेठ, पाचपावली, लकडगंज, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोदरानगर, कपिलनगर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हिंसाचाराच्या घटनेत एक क्रेन, दोन जेसीबी व काही चारचाकी वाहने जाळण्यात आली. एकूण ५ नागरिक जखमी झाले आहेत. तिघांवर उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे. दोन रुग्णालयात आहेत. त्यापैकी एक आयसीयूत आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगितला घटनाक्रम
नागपुरातील महाल परिसरातसकाळी साडेअकरा वाजता विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटाव असे नारे देत आंदोलन केले. हे आंदोलन करताना त्यांनी गवाताच्या पेंढ्यांनी बनवलेली प्रतिकात्मक कबर त्याठिकाणी जाळली. नंतर गणेशपेठ पोलिसांनी आंदोलकांवर संबंधित कलमान्वये गुन्हे दाखल केले. पण संध्याकाळी अफवा पसरवण्यात आली की, सकाळच्या आंदोलनात जी प्रतिकात्मक कबर जाळली, त्याच्या कापडावर धार्मिक मजकूर होता. मग २५० चा जमाव गोळा झाला आणि वातावरण हिंसक झाले, त्यानंतर पोलिसांना लाठीमार करावा लागला, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्यावरुन राज्यातील वातावरण गेल्या काही दिवसांपासून चांगलंच तापल्याचं बघायला मिळतंय.