राज्यात १७ ठिकाणी ‘ऑटोमॅटीक ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक’

या प्रश्नाला उत्तर देताना शिंदे म्हणाले, समृद्धी महामार्गावर वाहनांसाठी वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
राज्यात १७ ठिकाणी ‘ऑटोमॅटीक ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक’
PM

नागपूर : राज्यातील रस्ते अपघातात होणारे मृत्यू ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे रस्ते अपघात रोखण्यासाठी असलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून त्याचे दृश्यस्वरूपात लवकरच बदल दिसून येतील, अशी ग्वाही देतानाच वाहन चालक परवाना स्वयंचलित पद्धतीने देण्यासाठी राज्यात १७ ठिकाणी ऑटोमॅटीक ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यासाठी निविदाही काढलेल्या आहेत. तसेच गाड्यांचा  फिटनेस तपासण्यासाठी २३ ठिकाणी स्वयंचलित वाहनयोग्यता प्रमाणपत्र केंद्र उभारण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.

काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात राज्यातील रस्ते, महामार्गावर होणाऱ्या अपघाताबाबत   प्रश्न उपस्थित करत  अपघातामध्ये होणाऱ्या  मृत्यूबाबत चिंता व्यक्त केली. तसेच परदेशात वाहन परवाने कशापद्धतीने मिळतात याची माहिती देतानाच सरकारनेही यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली होती.

या प्रश्नाला उत्तर देताना  शिंदे म्हणाले, समृद्धी महामार्गावर वाहनांसाठी वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. आतापर्यत किमान ६० ते ७० लाख वाहनांनी प्रवास केला असून समृद्धी महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जे अतिशय वेगाने गाड्या चालवतात त्यामुळे अपघात होतात. हे अपघात मानवी चुकांमुळे झालेले  आहेत. परंतु, असे अपघात होऊ नये यासाठी सरकार प्रभावीपणे अंमलबजावणी करीत आहे. यामध्ये प्रत्येक दहा किमी अंतरावर रम्बलर बसविण्यात आले असून कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा देखील वापर करण्यात येत असून त्यामुळे  लवकरच अपघाताचे प्रमाण कमी होईल, असा विश्वासही  शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी झालेल्या चर्चेत वर्षा गायकवाड, देवयानी फरांदे यांनीही सहभाग घेतला.

दरम्यान, वाहन चालक परवाना स्वयंचलित पद्धतीने देण्यासाठी राज्यात १७ ठिकाणी ऑटोमॅटीक ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक उपलब्ध करून देण्यात येत असून त्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. वाहन परवाना मिळविण्याासाठी जे सर्व प्रक्रिया पार पाडतील त्यांनाच वाहनाचा परवाना दिला जाणार आहे.  या ट्रॅकसाठी दोन महिन्यात कार्यादेश देण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. २३ ठिकाणी ऑटोमॅटीक फिटनेस सेंटर्स देखील करण्यात येत असून वाहनांच्या फिटनेस प्रमाणपत्राची मुदत संपण्यापूर्वी संबंधितांना पूर्वकल्पना देण्याबाबत यंत्रणा तयार करण्यात येईल, असेही  एकनाथ शिंदे यांनी अन्य प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in