
पालघर : अवंतिका एक्स्प्रेसमधून आपल्या मुलाला आणण्यासाठी इंदूरला निघालेल्या ठाण्याच्या महिलेवर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पालघर स्थानकांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी वापी येथून चार जणांना अटक केली आहे.
पश्चिम रेल्वेवरील अवंतिका एक्स्प्रेसमधील जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या ठाण्याच्या ॲड. शितल भोसले या महिलेला हातात रुद्राक्ष माळ का घातली म्हणून एका मुस्लिम महिलेने विचारणा केली. हळूहळू दोन्ही महिलांमधील वादाचे रूपांतर हाणामारीवर आल्यानंतर पालघर रेल्वे स्टेशन ओलांडताना शितल यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले.
ही घटना घडल्यानंतर पालघर स्थानकात पोलिसांनी तत्काळ लक्ष घालून संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू करताच आरोपी हे वापी येथे असल्याची माहिती मिळाली आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळ, प्रत्यक्षदर्शी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली व आरोपींना ताब्यात घेतले.