
महाराष्ट्राच्या राजकारणात दररोज काहीतरी नवीन घडत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट, शिवसेना उबाठा नेत्यांनी फडणवीसांची घेतलेली भेट यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आधीच जोरदार चर्चा रंगलेल्या आहेत. अशातच आज राजधानी दिल्ली येथे एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला हे चांगलेच झोंबलेले दिसत आहे. कारण ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे चांगलेच भडकले आहेत. त्यांनी यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. यावेळी सरहद संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शरद पवार यांच्या हस्ते 'महादजी शिंदे राष्ट्र गौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी शरद पवारांनी आम्ही सर्व सातारकर असे म्हणत, काही जुन्या आठवणींना उजाळा दिला. नंतर एकनाथ शिंदे यांचे कौतुकही त्यांनी केले. ज्यांनी ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले, त्यात एकनाथ शिंदे यांनी मोठी जबाबदारी उचलली. मला आनंद आहे की त्यांचा आज इथे सत्कार होत आहे. साताऱ्याने बरेच मुख्यमंत्री दिले. महाराष्ट्राने त्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली याचा आनंद आहे, असे ते म्हणाले.
तर, एकनाथ शिंदे म्हणाले, पवार हे राजकारणात गुगली टाकणारे आहेत. त्यांची गुगली कोणाला कळत नाहीत. ते भारताचे स्पीन बॉलर सदाशिव शिंदे यांचे जावई आहेत. त्यांनी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. विचारधारा कितीही वेगळी असली तरी वैयक्तिक संबंध सगळ्यांनी टिकवायचे असतात, असे शिंदे म्हणाले. महापराक्रमी महादजी शिंदे यांच्या नावाचा पुरस्कार असून या सन्मानापेक्षा हा पुरस्कार मिळाल्यामुळे येणारी जबाबदारीची जाणीव मला आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
संजय राऊत काय म्हणाले?
या सत्कार कार्यक्रमामुळे उद्धव ठाकरे गटात कमालीची अस्वस्थता पसरली आहेत. संजय राऊतांनी यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. राज्याच्या शत्रूंना अशा प्रकारे पुरस्कार देणं आम्हाला पटलेलं नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. शरद पवारांनी शिंदे यांच्या कार्यक्रमाला जायला नको होतं अशी आमची भूमिका होती. महाराष्ट्राची वाट ज्यांनी लावली, ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो, त्यांच्याबरोबर जे लोक खुलेआमपणे बसलेत. त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणारं आहे. महाराष्ट्राच्या जनतेला हे पटलेलं नाही, असे त्यांनी म्हटले. कदाचित शरद पवारांकडे ठाण्याबाबत चुकीची माहिती आहे. ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्याचं काम गेल्या तीस वर्षात शिवसेनेने केले आहे. तर एकनाथ शिंदे ठाण्याच्या राजकारणात फार उशिरा आले. ते फार उशिरा आमदार झाले. उलट ते आल्यानंतर ठाण्याची वाट लागायला सुरुवात झाली, असेही राऊत म्हणाले. पवारांनी शिंदेंचा नाही, तर अमित शाह यांचा सत्कार केला..हे दुर्दैव आहे, अशी टीकाही त्यांनी केली.