
अमरावती : शेतकरी कर्जमाफीसाठी १५ दिवसांच्या आत उच्चस्तरीय समिती नेमली जाईल. त्यानंतर या समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफीबाबत निर्णय घेऊ. तसेच दिव्यांगांच्या मागणीसाठी मानधनवाढीची तरतूद करण्यात येईल, असे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिल्यानंतर गेल्या सात दिवसांपासून अन्नत्याग उपोषणाला बसलेल्या बच्चू कडू यांनी शनिवारी आपले उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली.
राज्य सरकारच्या या आश्वासनानंतर बच्चू कडू यांनीही सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी २ ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे. सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर २ ऑक्टोबर रोजी आम्ही थेट मंत्रालयात शिरू, असा इशारा त्यांनी दिला.
उदय सामंत यांनी शनिवारी अन्नत्याग आंदोलनासाठी बसलेल्या बच्चू कडू यांची भेट घेतली. यावेळी सामंत यांनी शासनाचे अधिकृत पत्र बच्चू कडू यांना वाचून दाखवले. अखेर सामंत यांच्या हस्ते फळांचा रस पिऊन बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन स्थगित केले.
“शेतकरी कर्जमाफीसाठी १५ दिवसांत उच्चस्तरीय समिती नेमली जाईल. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कर्जमाफीसंदर्भात निर्णय घेण्यात येईल, तथा थकीत कर्जदाराच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती देणे व नवीन कर्ज वाटप करण्यासाठी बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल. तसेच दिव्यांगांच्या मानधनवाढीबाबत ३० जूनच्या पुरवणी बजेटमध्ये तरतूद करण्यात येईल आणि उर्वरित मुद्द्यांवर संबंधित मंत्री तथा मुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत बैठक घेऊन मागण्या निकाली काढल्या जातील,” अशी तीन आश्वासने सरकारकडून कडू यांना देण्यात आली.
उपोषण स्थगित केल्यानंतर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. उपोषणामुळे गेल्या सात दिवसांत बच्चू कडू यांच्या वजनात सात किलोनी घट झाली आहे. त्यांचे रक्ताचे नमुने तपासले जात असून लघवीमध्ये मोठ्या प्रमाणात किटोन्स आढळल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
चक्काजाम आंदोलनही रद्द
माजी राज्यमंत्री आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन अखेर सात दिवसांनंतर स्थगित केले आहे. मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे-पाटील यांनी रविवारी पुकारलेले चक्काजाम आंदोलनही आता रद्द करण्यात आले आहे.
अजितदादांच्या कार्यक्रमात ‘प्रहार’चा राडा
पुणे : माजी मंत्री बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचे तीव्र पडसाद शनिवारी पुण्यात उमटले. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कार्यक्रम सुरू असताना प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विशेषतः महिला कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घालत जोरदार निदर्शने केली. अजितदादा व्यासपीठावर बोलण्यासाठी उभे राहताच प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारविरोधात आणि अजित पवारांविरोधात घोषणाबाजी सुरू केली. कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात झटापटही झाली, मात्र त्यानंतर पोलिसांनी त्यांना सभागृहाबाहेर काढले.