

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतलेल्या अन्न आणि औषध निरीक्षक पदभरतीच्या पेपरफुटी प्रकरणात आयोगातील तीन अधिकाऱ्यांना अटक झाल्याने आयोगाचे अध्यक्ष आणि सचिव यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी रविवारी एक्स या समाज माध्यमातून केली. त्यांच्या राजीनाम्याची मागणी आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.
पोलिसांच्या विशेष पथकाकडून तपास सुरू आहे. आयोगाचे सहाय्यक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नकाते, गोपाळ मराठे, अवर सचिव अभिजीत लेंडवे यांना अटक केली आहे.
वरिष्ठ आयएएस दर्जाचाच अधिकारी नेमा
एमपीएससीचे अध्यक्ष आणि सदस्य हे राजकीय संपर्क विरहित असणारेच असावेत, तर सचिव हा मंत्रालय कॅडरचा नियुक्त न करता वरिष्ठ आयएएस दर्जाचाच अधिकारी असला पाहिजे, अशी भूमिकाही कडू यांनी मांडली आहे.
विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावरची लढाई लढू
आयोगाच्या सध्याच्या सहसचिव आणि परीक्षा नियंत्रक यांच्या प्रतिनियुक्तीसाठी आयोगाची मान्यता नसताना परस्पर मनमानीपणे मंत्रालयातील अधिकारी एकतर्फी आयोगात पाठवण्याच्या तक्रारीची सखोल चौकशी करावी. या पदावरील व्यक्तीची नियुक्ती नियमबाह्य असल्याने ती तत्काळ रद्द करावी. प्रश्नफुटी संदर्भात प्राथमिक जबाबदारी परीक्षा नियंत्रक यांची असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा, अशा मागण्या कडू यांनी केल्या आहेत.