नागपूर : ‘प्रहार जनशक्ती’ पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वाखाली सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची स्वत:हून दखल घेत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सायंकाळी सहा वाजेपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश शेतकऱ्यांना दिले. मात्र, या आदेशानंतरही शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. पोलिसांनी न्यायालयाचे आदेश घेऊन आंदोलनस्थळी धाव घेतली, पण आंदोलकांच्या विरोधामुळे त्यांना आदेशासह परत जावे लागले. यावेळी बच्चू कडू यांनी सांगितले की, ‘आम्ही न्यायालयाच्या आदेशाचे पालन करतो, रस्ते मोकळे करतो, पण आमची व्यवस्था तुरुंगात करा’. कडू यांच्या या ताठर भूमिकेमुळे शेतकरी आंदोलनाला आक्रमक वळण मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलिस तैनात केले आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारकडून कोणतीही ठोस भूमिका अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तसेच सुमारे २२ विविध मागण्यांसाठी माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वाखाली ट्रॅक्टर आणि बैलगाडी मोर्चा तसेच राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू होते. नागपूर-वर्धा मार्गावरील पांजरा येथील कापूस संशोधन केंद्राजवळ शेकडो आंदोलकांनी मंगळवारी रात्रभर मुक्काम ठोकला आणि बुधवारी ठिय्या देऊन शेतकऱ्यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले. त्यामुळे दिवसभर नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प होती.
शेतकऱ्यांनी नागपूर-हैदराबाद महामार्ग (एनएच-४४) मंगळवारी जवळजवळ सात तास रोखला होता. त्यानंतर बुधवारीही आंदोलन सुरू ठेवण्यात आले आहे. सकाळी काही आंदोलक रेल्वे रुळांवर उतरले आणि त्यांनी ‘रेल्वे रोको’ करण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर टायर जाळत निषेध व्यक्त केला. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
दरम्यान, राज्य सरकारने राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि पकंज भोयर हे आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे जाहीर केले. आंदोलनकर्त्यांनी २२ मागण्यांसाठी आंदोलनाचा मार्ग अवलंबला असून, या मागण्यांमध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, बेरोजगारांना नोकरीच्या संधी, अपंग, विधवा आणि वृद्धांना नियमित अनुदान, तसेच शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील सुधारणा यांचा समावेश आहे.
आंदोलकांकडून रास्ता रोको व रेल्वे रोको
आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, सरकारकडून वारंवार आश्वासन मिळूनही ठोस निर्णय होत नसल्याने त्यांनी ‘रास्ता रोको’ आणि आता ‘रेल्वे रोको’ आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. यापूर्वी २१ तासांसाठी राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवला होता. या पार्श्वभूमीवर नागपूर आणि आसपासच्या भागात वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. प्रशासन आणि रेल्वे विभागाने चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
न्यायालयाच्या आदेशाबद्दल बच्चू कडू यांची नाराजी
यावेळी बच्चू कडू यांनी प्रश्न उपस्थित केला की, शेतकरी आत्महत्या करतात तेव्हा न्यायालय सरकारला आदेश देत नाही, पण शेतकरी एक दिवस रस्त्यावर उतरले तर तत्काळ आदेश दिले जातात. न्यायालयाच्या या दुटप्पी निकषाबद्दल त्यांनी आश्चर्य आणि नाराजी व्यक्त केली.
महादेव जानकर यांचा सरकारला इशारा
हे सरकार माघार घेते की आपण घेतो हे बघतोच मी आता, असे म्हणत महादेव जानकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना झोपू देणार नाही, असा इशारा दिला.
जामठा उड्डाणपूल आंदोलनाचे मुख्य ठिकाण
या आंदोलनाचे मुख्य ठिकाण जामठा उड्डाणपूल होते, जो समृद्धी एक्सप्रेस वेचा प्रवेशद्वार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृह जिल्हा आहे. आंदोलकांनी सांगितले की सरकारने आता शेतकऱ्यांच्या समस्या ऐकल्या पाहिजेत.
महामार्ग मोकळा करण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश
नागपूर शहराबाहेरील राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेले आंदोलन तत्काळ हटवून राष्ट्रीय महामार्ग मोकळा करावा, असा आदेश नागपूर खंडपीठाने बुधवारी दिला. न्यायमूर्ती राजनिश व्यास यांच्या अध्यक्षतेखालील सुट्टीकालीन खंडपीठाने माध्यमांतील वृत्तांची स्वतःहून दखल घेतली. त्यांनी सांगितले की, पोलिसांनी २६ ऑक्टोबर रोजी कडूंना केवळ २८ ऑक्टोबरच्या एका दिवसासाठी मौजा पारसोडी येथे आंदोलनाची परवानगी दिली होती. प्राथमिकदृष्ट्या स्पष्ट आहे की कोणतीही परवानगी नसताना आंदोलन सुरू ठेवण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ (वर्धा रोड) वर २० किलोमीटर लांबीचा ट्रॅफिक जाम झाला असून खासगी वाहनांसह रुग्णवाहिका आणि पोलिस वाहनेही अडकली. त्यामुळे जनतेला प्रचंड गैरसोय झाली.
खंडपीठाने आदेश दिला की कडू आणि त्यांच्या समर्थकांनी आंदोलनस्थळ तत्काळ रिकामे करावे आणि कायदा-सुव्यवस्था भंग होणार नाही अशा शांततेच्या मार्गाने आंदोलन हटवावे. जर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले, तर कडू आणि त्यांच्या समर्थकांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही न्यायालयाने दिला. या प्रकरणात सरकारतर्फे अॅडव्होकेट देवेंद्र चौहान यांनी बाजू मांडली.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चेतून तोडगा काढा - फडणवीस
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी संवादाचा मार्ग स्वीकारा, रस्ते रोखून आंदोलन करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी माजी मंत्री बच्छू कडू यांना केले. पुण्यातील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, “आंदोलनामुळे सर्वसामान्यांची अडचण होते आणि काही स्वार्थी प्रवृत्तीचे लोक अशा आंदोलकांमध्ये घुसून हिंसाचाराला खतपाणी घालतात. त्यामुळे आंदोलनाऐवजी चर्चेतून तोडगा काढावा.”