
नागपूर : महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याच्या तयारीत असलेले देवेंद्र फडणवीस हे संवेदनशील, सभ्य आणि मदत करणारे विद्यार्थी होते, ज्यांनी कधीही आपल्या कुटुंबाच्या राजकीय पार्श्वभूमीचा अभिमान मिरवला नाही, असे त्यांच्या शाळेतील एका शिक्षिकेने सांगितले.
फडणवीस शाळेत उंच विद्यार्थ्यांपैकी एक असल्याने ते नेहमी मागील बाकावर बसत, असे सरस्वती विद्यालयातील त्यांच्या वर्ग ८ ते १० च्या शिक्षिका सावित्री सुब्रमण्यम यांनी सांगितले.
बुधवारी, फडणवीस यांची महाराष्ट्र भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी सर्वसंमतीने निवड झाली. तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून त्यांचा शपथविधी होणार आहे. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा पहिला कार्यकाळ २०१४ ते २०१९ या पाच वर्षांचा होता. तर दुसरा कार्यकाळ नोव्हेंबर २०१९ मध्ये हा केवळ ८० तासांचाच ठरला होता.
सहा वेळा आमदार राहिलेले आणि नागपूरचे सर्वात तरुण महापौर म्हणून काम पाहिलेले फडणवीस यांनी आपले शालेय शिक्षण राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये पूर्ण केले.
फडणवीस यांच्या स्वभावाची आठवण सांगताना सवित्री सुब्रमण्यम म्हणाल्या की, फडणवीस अभ्यासात सामान्य आणि अति विशिष्ट नसले तरीही उत्तम अभ्यास करत. ते खूप सभ्य,
हसतमुख आणि संवेदनशील विद्यार्थी होते. उंच विद्यार्थ्यांपैकी एक असल्यामुळे ते इतर उंच विद्यार्थ्यांसोबत वर्गात मागच्या बाकावर बसत, असेही त्यांनी सांगितले.
फडणवीस यांच्या वर्गात एक पोलिओग्रस्त विद्यार्थी होता. त्याला चालण्यासाठी मदतीची आवश्यकता होती. फडणवीस यांच्यासह संपूर्ण वर्ग नेहमी त्याला मदत करत असे. एवढेच नव्हे तर त्यांचा संपूर्ण वर्गच मुद्दाम तळमजल्यावरच ठेवण्यात आला होता. त्या विद्यार्थ्याला त्रास होऊ नये म्हणून ही सुविधा करण्यात आली होती, असेही सुब्रमण्यम म्हणाल्या. फडणवीस यांचा वर्ग समजूतदार होता. त्यात फडणवीस हे खूपच संवेदनशील होते आणि ते गरजूंना मदत करत असत, असेही शिक्षिकेने सांगितले.
सुब्रमण्यम यांनी फडणवीस यांची एक सभ्य आणि साधा विद्यार्थी म्हणून आठवण करून दिली. फडणवीस यांनी त्यांच्या कुटुंबाच्या राजकीय पार्श्वभूमीचा कधीच आधार घेतला नाही. फडणवीस यांचे वडील गंगाधरराव फडणवीस हे तेव्हा विधान परिषदेचे सदस्य होते.
फडणवीस हे नेहमीच त्यांच्या तत्त्वांबाबत स्पष्ट असत आणि त्यांच्या पालकांच्या संस्कारांमुळेच त्यांचे बोलणे नेहमीच स्पष्ट आणि ठाम असे, असेही त्यांनी सांगितले.
सुब्रमण्यम यांनी फडणवीस यांच्याबद्दलची आठवण काढताना नमूद केले की, फडणवीस जेव्हा नागपूरचे महापौर झाले (वयाच्या २७ व्या वर्षी) तेव्हा त्यांचा शाळेत सत्कार करण्यात आला होता. तसेच त्यांच्या वर्गातील मुलांच्या पुनर्मिलनाच्या कार्यक्रमातही ते कुटुंबासह शाळेत आले होते.
फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याबद्दल सुब्रमण्यम म्हणाल्या की, त्यांचा हा गौरव पाहून खूप अभिमान वाटत आहे.
...असे वाटले नव्हते
फडणवीस शाळेत कधीही मंचावर आले नाहीत किंवा कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले नाहीत. ते एवढे चांगले वक्ते बनतील असे त्यामुळे कधीच वाटले नाही, असे शिक्षिका सावित्री सुब्रमण्यम यांनी सांगितले. फडणवीस विद्यार्थी म्हणून अभाविपमध्ये सहभागी झाले. त्यामुळेच त्यांनी वक्तृत्वाची कला आत्मसात केली असावी, असेही त्या म्हणाल्या.
प्रभावी सोशल मीडिया वापरकर्ते
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला. त्यामुळे त्यांना त्यांच्या समकालीन नेत्यांपेक्षा सोशल मीडियावरील वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्यास मोठ्या प्रमाणावर मदत झाली, असे निरिक्षण एका राजकीय निरीक्षकाने नोंदविले आहे.
कायद्याचे शिक्षण घेतलेले भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे सोशल मीडियावर महाराष्ट्रातील "सर्वाधिक फॉलो केलेले" नेते आहेत, असेही ठाणेस्थित सोशल मीडिया तज्ज्ञ प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले.
कुलकर्णी यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, देवेंद्र फडणवीस हे केवळ निवडणूक कालावधीतच नव्हे तर सातत्याने मतदारांशी संवाद साधत होते.
राज्यातील प्रमुख राजकीय नेत्यांमध्ये सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर फडणवीस यांचा सर्वाधिक सहभाग असल्याचे कुलकर्णी यांनी नमूद केले. मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर असलेल्या युवकांनी डिजिटल प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणावर स्वीकार केला आहे, असे त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा फडणवीस यांनी सोशल मीडियावर दररोज प्रचार मोहिम सुरू केली होती, असे कुलकर्णी म्हणाले. त्यांचे सोशल मीडिया पोस्ट नेहमीच त्यांच्या प्रत्येक सार्वजनिक सभेची किंवा कार्यक्रमाची माहिती देत असत. त्यांच्या चमूने ॲनिमेटेड ग्राफिक्स, खास गाणी, प्रेरणादायक गीत आणि रॅप म्युझिकचा वापर केला तसेच बातम्यांच्या चॅनेल्समधील लहान व्हिडिओ शेअर केल्याचेही सांगण्यात आले.
सर्वाधिक फॉलोअर
एक्स (पूर्वीचे ट्विटर) - ५९ लाख
फेसबुक - ९१ लाख
इंस्टाग्राम - २० लाख
यूट्यूब - ११ लाख
कुछ खट्टा
२०१६ मध्ये ‘भारत माता की जय’वरून वाद: एप्रिल २०१६ मध्ये नाशिक येथील सभेत बोलताना फडणवीस म्हणाले होते की, “प्रत्येक भारतीयाने 'भारत माता की जय' म्हणावे लागेल आणि जे हा नारा देण्यास नकार देतील त्यांनी देशात राहू नये, त्यांनी पाकिस्तान किंवा चीनमध्ये जावे.” या वक्तव्यामुळे मुस्लीम समाजाला लक्ष करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप टीकाकारांनी केला. नंतर फडणवीस यांनी स्पष्ट केले की, या मुद्द्याचा धर्माशी काहीही संबंध नाही.
२०२३ मध्ये औरंगजेब संदर्भातील टिप्पणी:
जून २०२३ मध्ये कोल्हापूर येथे औरंगजेब यांचे गौरव करणाऱ्या सोशल मीडिया पोस्टवरून दंगली झाल्यानंतर उपमुख्यमंत्री असलेल्या फडणवीस यांनी एका सभेत विचारले होते की, महाराष्ट्रात इतके औरंगजेब समर्थक, 'औरंगजेब की औलाद', अचानक कसे निर्माण झाले? काही राजकीय विश्लेषकांनी फडणवीस यांच्या 'औरंगजेब की औलाद' या विधानावर टीका केली. यामध्ये मुस्लिम समाजाला लक्ष्य करण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न असल्याचे म्हटले.
कुछ मीठा
समृद्धी एक्सप्रेस-वे: फडणवीस मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र सरकारने नागपूर-मुंबई वेगवान वाहतुकीसाठी एक उपक्रम प्रस्तावित केला. नियोजित नवीन शहरांसह मुंबई आणि नागपूर दरम्यान सुरक्षित आणि जलद प्रवास सक्षम करण्यासाठी हा महामार्ग बांधण्यात आला. २२ डिसेंबर २०१९ रोजी सरकारने महामार्गाचे "हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग" असे नामकरण केले.
जलयुक्त शिवार: दुष्काळावर मात करण्यासाठी आणि शाश्वत शेती करण्यासाठी महाराष्ट्र
सरकारने २०१६ मध्ये 'मागेल त्यला शेततळे' योजना सुरू केली. या 'मागेल त्याला शेततळे' अंतर्गत १०८.३३ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले. राज्यातील शेतकऱ्यांनी कृषी उत्पादनात शाश्वतता आणि पाणलोटांच्या माध्यमातून सिंचनाची उपलब्धता वाढवण्यासाठी आणि कोरडवाहू प्रदेशातील जलसंधारणासाठी काही शेततळे उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्याचा दुष्काळात शेतकऱ्यांना लाभ झाला.
नगरसेवक ते महापौर
फडणवीस यांची राजकीय वाटचाल उल्लेखनीय आहे. नागपूर महापालिकेतील साध्या नगरसेवकापासून सर्वात तरुण महापौरपदापर्यंतचा त्यांचा प्रवास पक्षातील प्रमुख नेते म्हणून उभा राहणारा ठरला आहे. २२ व्या वर्षी नगरसेवक म्हणून निवडून आलेले फडणवीस १९९७ साली २७ व्या वर्षी नागपूरचे सर्वात तरुण महापौर बनले. त्यांनी १९९९ मध्ये पहिली विधानसभा निवडणूक जिंकली आणि त्यानंतर तीन निवडणुकांमध्ये विजय मिळवला. गेल्या महिन्यातील निवडणुकीत त्यांनी नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघ सुरक्षित ठेवला.
मोदीज् मॅन
२०१४ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी फडणवीस यांना दिलेली पाठिंबा त्यांच्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरला. प्रचारसभेत मोदी यांनी त्यांना "देशाला दिलेली नागपूरची भेट" असे संबोधून त्यांच्या क्षमतेवर विश्वास दाखवला होता. २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या मोठ्या यशाचा काही भाग फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य भाजपच्या कामगिरीलादेखील दिला जातो.
गडकरी गुरू
फडणवीस हे जनसंघ आणि नंतर भाजप नेते स्वर्गीय गंगाधरराव फडणवीस यांचे सुपुत्र आहेत. नागपूरचे नेते आणि भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी त्यांना आपला "राजकीय गुरु" मानतात. फडणवीस यांनी १९८९ साली आरएसएसच्या विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला.
"मी पुन्हा येईन" घोषवाक्य फसले
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर, शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद वाटपाच्या मुद्द्यावर भाजपशी असलेली आघाडी तोडली. फडणवीस यांचे "मी पुन्हा येईन" हे घोषवाक्य सपशेल फसले. २३ नोव्हेंबर २०१९ रोजी फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने अविश्वास ठराव होण्यापूर्वीच फडणवीस यांनी तीन दिवसांत राजीनामा दिला.
अनिच्छुक उपमुख्यमंत्रीपद
जून २०२२ मध्ये शिवसेनेचा मोठा गट फुटल्यानंतर फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचे आदेश भाजप नेतृत्वाकडून मिळाले. प्रारंभी अनिच्छुक असतानाही त्यांनी हे पद स्वीकारले. शेवटच्या अडीच वर्षांच्या काळात उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी कामगिरी केली. नोव्हेंबर २३ च्या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशाने कार्यकाळाने कळस गाठला.