अखेर उल्हासनगरात अक्षय शिंदेचा मृतदेह केला दफन; तणावामुळे प्रचंड पोलीस बंदोबस्त; विरोध निष्फळ

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या दफनविधीला शिंदे गट, भाजप आणि स्थानिक नागरिकांनी उल्हानगरात कडाडून विरोध केल्यानंतरही पोलिसांनी प्रचंड बंदोबस्तात हा दफनविधी पार पाडला.
अखेर उल्हासनगरात अक्षय शिंदेचा मृतदेह केला दफन; तणावामुळे प्रचंड पोलीस बंदोबस्त; विरोध निष्फळ
Published on

उल्हासनगर : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या दफनविधीला शिंदे गट, भाजप आणि स्थानिक नागरिकांनी उल्हानगरात कडाडून विरोध केल्यानंतरही पोलिसांनी प्रचंड बंदोबस्तात हा दफनविधी पार पाडला.

अक्षय शिंदेच्या दफनविधीसाठी प्रशासनाला उल्हासनगरात प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला. शिंदे गटाचे नेते राजेंद्र चौधरी, बाळा श्रीखंडे, भाजपचे शहराध्यक्ष प्रदीप रामचंदानी, कपिल अडसूळ आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन हा दफनविधी उल्हासनगरात होऊ नये, यासाठी तीव्र विरोध केला. शेकडो नागरिकांनी स्मशानभूमीत एकत्रित येऊन घोषणाबाजी केली, तर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी खणलेल्या दफनभूमीच्या खड्ड्यात पुन्हा माती टाकून हा दफनविधी थांबवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे उल्हासनगरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांच्या कडक बंदोबस्तात हा दफनविधी अखेर शांततेत पार पडला.

हायकोर्टाच्या आदेशानंतर उल्हासनगर कॅम्प नंबर ३ येथील शांतीनगर स्मशानभूमीत अक्षय शिंदेचा दफनविधी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, शेकडो नागरिकांनी स्मशानभूमीत हजेरी लावत अक्षय शिंदेला येथे दफन करण्यास विरोध दर्शविला. नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला.

पोलिसांनी विरोध करणाऱ्यांना घेतले ताब्यात

शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी दफनासाठी खणलेल्या खड्ड्यात पुन्हा माती टाकली होती. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर जेसीबीच्या सहाय्याने पुन्हा खड्डा खोदून ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने अखेर पोलिसांनी राजेंद्र चौधरी, बाळा श्रीखंडे, प्रदीप रामचंदानी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. या विरोधामुळे स्मशानभूमीत काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

logo
marathi.freepressjournal.in